मुंबई : सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे दोन्ही भाग मिळून तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केले जात असल्याची चर्चा आहे.
मात्र, रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायण’आधीही बॉलीवूडमध्ये ‘रामायण’वर भव्य चित्रपट बनवण्याचे प्रयत्न झाले होते. विशेष म्हणजे, एका प्रोजेक्टमध्ये अभिनेता अजय देवगण प्रभू रामाची भूमिका साकारणार होता. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट कधीच प्रेक्षकांसमोर येऊ शकला नाही.
राजकुमार संतोषीही बनवणार होते ‘रामायण’
दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनीही काही वर्षांपूर्वी ‘रामायण’वर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी या प्रकल्पाची पुष्टी केली होती. या चित्रपटात प्रभू रामाच्या भूमिकेसाठी अजय देवगण, तर लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी रितेश देशमुख यांची निवड करण्यात आली होती.
रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेता प्रकाश राज यांना घेण्याचा निर्णय झाला होता. प्रकाश राज यांची रावणाच्या भूमिकेसाठी निवड करण्यापूर्वी आपण बराच विचार केला होता, असे संतोषी यांनी सांगितले होते. तसेच रावणाच्या संपूर्ण कुटुंबातील भूमिकांसाठी दक्षिण भारतीय कलाकारांना संधी देण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या स्तरावर साकारण्याची तयारी सुरू होती.
100 कोटींच्या बजेटमध्ये होणार होता चित्रपट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार संतोषी यांचा ‘रामायण’ चित्रपट सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्याची योजना होती. त्या काळात 100 कोटी रुपये हे बॉलीवूडमधील अत्यंत मोठे बजेट मानले जात होते.
चित्रपटाची स्टारकास्ट आणि कथानक यामुळे या प्रकल्पाची मोठी चर्चा झाली होती. मात्र, अनेक तयारी करूनही हा चित्रपट पूर्णत्वास जाऊ शकला नाही. अखेर हा प्रकल्प रखडला आणि ‘रामायण’ मोठ्या पडद्यावर येण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
आता रणबीर-यशच्या ‘रामायण’कडे लक्ष
दरम्यान, नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेली ‘रामायण’ दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रदर्शनाची यावर्षी तयारी असून दुसरा भाग पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाची भूमिका साकारत आहे. अभिनेता सनी देओल भगवान हनुमानाच्या, तर रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
याशिवाय अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय आणि कुणाल कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा भाग आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांचे लक्ष रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायण’कडे लागले आहे.
