बेळगावात पहिल्यांदाच प्रकार, 55 हजारांचे चॉकलेट जप्त
त.भा. प्रतिनिधी
बेळगाव : एकीकडे अमलीपदार्थमुक्त बेळगावसाठी बेळगाव पोलिसांचे अभियान सुरू असताना दुसरीकडे अमलीपदार्थांची विक्री व सेवन वाढविण्यासाठी स्थानिक व परप्रांतीय गुन्हेगारांनी आपले प्रयत्न वाढवले आहेत. आजवर केरळ व मंगळूरमध्ये मिळणाऱ्या गांजामिश्रित चॉकलेटची बेळगावातही विक्री सुरू असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांनी गांजामिश्रित चॉकलेटसह एका तरुणाला अटक केली आहे.
उद्यमबाग पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटे, उपनिरीक्षक उद्दाप्पा कट्टीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी केएलई इंजिनिअरिंग रोडवर ही कारवाई केली आहे.
भोलू जितलाल प्रजापती (वय 39) मूळचा राहणार उत्तरप्रदेश, सध्या राहणार हनुमाननगर याच्याजवळून तब्बल 6 किलो 850 ग्रॅम इतके गांजामिश्रित चॉकलेट जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत सुमारे 55 हजार रुपयांइतकी होते. त्याच्याजवळून गांजामिश्रित चॉकलेटबरोबरच विक्रीसाठी वापरण्यात आलेली एक दुचाकी, 600 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच पोलिसांनी जप्त केला आहे.
नशामुक्त बेळगावसाठी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सुरुवातीपासूनच अभियान राबवले आहे. मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त करून ते नष्टही करण्यात आले आहेत. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृतीची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. एकीकडे अमलीपदार्थांविरुद्ध व्यापक लढा सुरू असतानाच विक्रेत्यांनी चॉकलेटमध्ये गांजा घालून त्याची विक्री सुरू केली आहे.
मध्यंतरी केरळच्या सीमेवर व मंगळूरमध्ये गांजामिश्रित चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. शाळा-कॉलेजजवळ असलेल्या दुकानातून 20 रुपयाला एक चॉकलेट मिळत होते. या चॉकलेटचे सेवन करणाऱ्या मुलांमध्ये विचित्र बदल घडत होते. हे लक्षात आल्यानंतर मंगळूर परिसरातील अनेक पालकांनी पोलीस दलाकडे तक्रार केली. मंगळूर उत्तर व दक्षिण पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातील दोन दुकानात छापे टाकून 120 किलो गांजामिश्रित चॉकलेट जप्त केले होते. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजले होते. त्यानंतर रायचूर, कर्नाटकाची राजधानी बेंगळूर परिसरातही गांजामिश्रित चॉकलेटची विक्री आढळून आली होती. आता बेळगावातही ती सुरू झाली असून शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नशेबाज बनविण्यासाठी ही टोळी आता चॉकलेटमधून गांजा घालून विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटे यांनी अनेक विद्यार्थ्यांना व तरुणाईला नशेबाज बनविण्यासाठी चॉकलेट विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक केली आहे.
