Headlines

अमित शाह यांचं महाराष्ट्राला गिफ्ट, राज्यात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात सहभागी होत मोठी घोषणा केली. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय आता दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्यात येणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली.

Amit Shah
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केली.

बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी तसेच अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शाह यांचे को-ऑपरेटिव्ह बँकांना मोलाचं आवाहन

“देशातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने, अगदी एका शाखेच्या बँकेनेही अंब्रेला ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व घ्यावे. सदस्यत्व घेतल्यानंतर सुरक्षा संचालन केंद्राशी (सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरशी) जोडले जावे. यामुळे बँकांमधील ठेवीदारांचा विश्वास वाढण्यास मदत होईल आणि बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित होईल”, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले.

बँकिंग क्षेत्रातील बदलाची दिली माहिती

“अंब्रेला संस्था बँकिंग क्षेत्रात करण्यात येत असलेल्या नवीनतम सुधारणांची माहिती तसेच म्यूल हंटरसारख्या अनेक आवश्यक सॉफ्टवेअर सुविधा देखील या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. या अंब्रेला संस्थेच्या मदतीने कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करता येतील, जे कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रात इतरांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी तसेच जनता आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विश्वास संपादन करण्यासाठी अंब्रेला संस्था मार्गदर्शक ठरणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“देशातील सुमारे १,४०० अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये जवळपास सहा लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. देशाच्या आर्थिक विकासात या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. छोटे दुकानदार, व्यापारी, कुटीर उद्योग, एमएसएमई, स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट तसेच मध्यमवर्गीयांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी छोट्या कर्जांची आवश्यकता असते”, असे अमित शाह म्हणाले.

कोणत्याही हमीशिवाय 5 लाख कर्ज

“मोठ्या बँकांना अनेकदा या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही; मात्र तालुका पातळीवरील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका ही भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकतात. कर्जाची रक्कम जितकी कमी तितकी त्याची परतफेडीची शक्यता अधिक असते. कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता अडीच लाख रूपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेतील तब्बल ९९.७८ टक्के कर्जे व्याजासह परतफेड झाली आहेत. यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते”, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचा उल्लेख

“महाराष्ट्रात ४४९ सहकारी बँका असून देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत. त्यामुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल. देशातील शहरी सहकारी बँकांना ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे”, असे अमित शाह यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. ‘सहकारातून समृद्धी’चा अर्थ केवळ बँक किंवा संस्थेची समृद्धी नसून, बँकेच्या ग्राहकाला समृद्ध करणे हा आहे. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर सक्षम करण्यासाठी ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून आज महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे”, असे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

शाह यांचं डिजीटल फसवणुकीवरही भाष्य

“देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना डिजीटल फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग सुरक्षित करण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘म्यूल हंटर’सारखे उपक्रमही सुरू केले आहेत. राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठासोबत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक प्रतिबंध, डिजिटल फॉरेन्सिक, बँकिंग सुरक्षेसह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील”, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी शहरी सहकारी बँकांसाठी सुरक्षा संचालन केंद्राचीही सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शाह यांच्या हस्ते सायबर सेक्युकिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन

या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शहरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भातील सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) चे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री यांनी लिहिलेल्या ‘ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट – अ प्रॅक्टिकल गाईड टू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरीत्या जोडल्या गेलेल्या प्रथम सहा शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत ‘कोर बँकिंग सर्व्हिस’ आणि संबंधित सेवांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी आणि एनयूसीएफडीसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा