सभ्यता, आतिथ्यभाव शोभा वाढविणारा सद्गुण होय. चांगले बोलावे, चांगले वागावे, माणुसकी जपावी यात मोठेपणा आहे. आनंद आहे.

काळवेळ ही बलशाली असते. काळाचा महिमाही अपार, विलक्षण आणि अनाकलनीय असतो. समयासी सादर व्हावे, असे म्हटले जाते. भगवंत ठेवील तसे राहावे, असेही अनेक संत-सज्जनांनी म्हटले आहे. हत्ती, पालखी, ऐश्वर्य, गाडीघोडे, नोकरचाकर, बंगले यांची कधी रेलचेल अन् प्राप्ती; तर कधी याचना, हतबलता, अपयश, दीनवाणी अवस्था आणि यमाचे बोलावणे अर्थात देहाची अखेर. सुबत्ता फार काळ टिकेल याचा काय भरवसा महाराज? सौजन्यशीलता खरे तर अनमोल दागिना आहे.
महान आध्यात्मिक गुरू रामकृष्ण परमहंस , पूज्य महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा अनेक थोरांनी आचार-विचारांतून सौजन्य, सभ्यता, सतशील गुणांची शिकवण अवघ्या जगाला दिली. आपण त्यांच्या गुणांचे होता होईल तितके अनुसरण करावे. वेळ, कालगतीचा आदर फार फार महत्त्वाचा. अवमान, अवमूल्यन कधी करू नये माणसाने. समयासी सादर असावे आणि सद्गुरू कृपेची प्रतीक्षा असावी. याबाबत पंढरपूरजवळील अरण गावीचे कर्मयोगी संतशिरोमणी सावता महाराज सांगतात –
समयासी सादर व्हावें।
कोणे दिवशी होईल सद्गुरुची कृपा ।
कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा ॥
बदलता काळ खूप काही शिकवून जातो. तो प्रसंगी पदरात वेदनेचे बोचकेही टाकून द्यायला कमी करत नाही! या अर्थाने ‘समय बडा बलवान’ हेच अंतिम सत्य. सदाचार सोडता कामा नये हे पक्के उमगले पाहिजे इतकेच! काही माणसे कमालीची संकोची असतात. निरागस हळवी असतात. अत्यंत भावनाशील अन् श्रद्धाळू असतात. फुलांहून मनाने – स्वभावाने कोमल मृदू असतात. काही तर स्वतःहून कमीपणा घेऊन समंजसपणाचा कळस गाठतात.
धीरगंभीर – शांत लोक आयुष्यात यशस्वी ठरतात. जिव्हाळा मात्र जपायलाच हवा. दातृत्व, निर्मोही भाव, माया ममता हे झाले सद्गुण – दैवी गुण. टोकाची भूमिका जगणे-वागणे गैरच. म्हणूनच सौजन्य, सभ्यता बाळगावी. कृतज्ञ – विनम्र असावे. सहकार्याचे मोल ओळखावे, संकटकाळी – दु:खात धावून जावे. उर्मटपणा-गर्व, मुजोरी-उद्दामपणा, घमेंड कामालाही येत नाही… अन् शेवटालाही जात नाही!

