Headlines

Tukaram Mundhe Suggests Employees Can Resign If they Refuse to Follow Rules


तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्र्याकडे तक्रार केली होती. याबाबत तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती समोर आलेली. अपुरे मनुष्यबळ असताना जास्तीचे काम, सुट्टींच्या दिवशी काम आणि जास्त शिफ्ट लावून अतिरिक्त ताण दिला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. या आरोपांबाबत तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलं.

“कर्मचाऱ्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार केलेली नाही. त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे काही मागण्या केलेल्या आहेत. ते निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील लॅबच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आहे की, आम्हाला सुट्टी दिली जात नाही. आम्हाला अनेक तास काम करायला लावतात”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या पहिल्या मागणीवर मुंढे काय म्हणाले?

“पहिली मागणी अशी आहे की, त्यांना इतर कार्यालयांप्रमाणे जसे 10 ते 6 हा कार्यालयीन वेळ आहे त्याप्रमाणे कामासाठी वेळ द्यावा. पण कार्यालय आणि लॅब याच्यात फरक असतो. लॅब 24 तास चालू असते. कार्यालय 24 तास चालू नसतं. आठ तास लॅबचा वेळ नसतो”, असं मुंढे म्हणाले.

“अर्थात कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करायचं नसतं. त्यांनी आठ तास काम करायचे. त्यापेक्षा जास्त काम दिलेलं नाही. दोन शिफ्टमध्ये काम केलं पाहिजे. प्रत्येकजण दिवसांत एकच शिफ्ट करणार. एकाला कमीत कमी एक दिवस सुट्टी मिळेल”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

“अजून आपण 24 तास 7 दिवस लॅब चालू केलेलं नाही. सध्या 2 शिफ्टमध्ये 6 दिवस चालू केलेलं आहे. गरज पडली तर 7 दिवस करावं लागेल. कारण लॅब 24 तास चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांची पहिली मागणी अत्यंत चुकीची आहे. ते होऊ शकत नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या मागणीवर मुंढेंची प्रतिक्रिया

“त्यांची दुसरी मागणी ही 10 ते 6 वेळेची आहे. पण ते होऊ शकत नाही”, असंदेखील तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या मागणीवर मुंढे काय म्हणाले?

“तिसरी मागणी ही सुट्टीची आहे. आठवड्यातून एक दिवस सुट्टी तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे तो देखील विषय नाही. त्यामुळे त्यांचे काही गैरसमज झाले असतील ते पुढच्या काही काळात दूर होतील. आता तिथे व्यवस्थित काम चालले आहे. त्यांना समजून सांगितलेले आहे की, या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. ज्यांना शासन नियमांनुसार काम करायचं नाही ते राजीनामा देऊ शकतात”, अशी भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.