![]()
शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची ही आकडेवारी आधार संलग्निकरणानंतर पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी खातेदारांचे आधार संलग्निकरण आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना मिळेल. तसेच, ज्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड केली नाही, तेही पात्र असतील. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल. यासाठी शेतीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. ज्या अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करण्यात आले आहे आणि त्याचे हप्ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असतील, अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) अंतर्गत अदा केली जाईल. २०१९ च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्यास, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच त्यांना ५० हजार रुपयांचा ओटीएस लाभ मिळेल. शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Source link
संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार
