![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज विविध मुद्द्यांवरून राज्य सरकार, प्रशासन आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळ, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काँग्रेसच्या माफीच्या मागणीवरून रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. या सर्व मुद्द्यांवर भूमिका मांडताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. “बीएलओकडून नको ती कामे, महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती होण्याची भीती” मतदार याद्या आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेबाबत रोहित पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सध्या बीएलओकडून (BLO) चुकीच्या पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. बीएलओ नको त्या कामांमध्ये गुंतले आहेत. या प्रक्रियेत बिहारमध्ये जो प्रकार घडला होता, तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रातही निर्माण होण्याची भीती वाटत आहे.” यातून त्यांनी प्रशासकीय पातळीवर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेवरून संताप; ‘फेरपरीक्षेची मागणी करणार’ रविवारी पार पडलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेतील गोंधळावरही त्यांनी आवाज उठवला. “या परीक्षेचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र, त्यांचे सॉफ्टवेअर अचानक बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना पेपरच देता आला नाही. परिणामी, संतप्त विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. या गंभीर प्रकाराबाबत आम्ही आज हायकोर्टाच्या प्रशासकांची भेट घेणार असून, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणार आहोत,” असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले. अमित शाह आणि किरीट सोमय्यांवर पलटवार काँग्रेसने देशाची माफी मागावी, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा रोहित पवारांनी खरपूस समाचार घेतला. “काँग्रेसने नाही, तर सर्वात आधी भाजपने देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांनीच राजस्थानमध्ये उलटा झेंडा फडकवला होता आणि चुकीचे वंदे मातरम गाणे लावले होते,” अशी आठवण पवारांनी करून दिली. तसेच, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर बोचरी टीका करताना, “त्यांचे काम फक्त बोंबलत सुटायचे आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. “शरद पवार साहेब सह्याद्रीसारखे भक्कम” आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीबाबत बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, “येत्या २५ तारखेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत आमची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील.” यासोबतच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संघर्षाचे आणि खंबीर नेतृत्वाचे कौतुक करताना त्यांनी, “शरद पवार साहेब सह्याद्रीसारखे भक्कम उभे आहेत,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. हेही वाचा.. मुंबई हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत महाराष्ट्रभर तांत्रिक गोंधळ:अभिजित दिपकेंचा सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, संतापानंतर हायकोर्टाकडून गंभीर दखल मुंबई हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी महाराष्ट्रभर मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले. तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे, असे प्रकार घडले. यामुळे संतप्त उमेदवारांनी संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रांबाहेर ठिय्या आंदोलन केले. या प्रकाराची हायककोर्टाच्या रजिस्ट्रारनेही दखल घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत कळवले जाईल, अशी नोटीस जारी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
बिहारमध्ये जे झालं, तेच महाराष्ट्रात होण्याची भीती:बीएलओंच्या कामावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप, टायपिंग परीक्षा घोळावरही संताप
