Headlines

रेशन कार्डवर नाव चुकलंय का? घरबसल्या ऑनलाईन करा दुरुस्ती, प्रोसेसही सोपी । Maharashtra Times


सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शासकीय कामांसाठी रेशन कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो. मात्र, अनेकदा रेशन कार्डवर नावाचे स्पेलिंग किंवा पत्ता चुकल्यामुळे नागरिकांना धान्य मिळण्यात किंवा इतर कामात अडचणी येतात. आता ही चूक सुधारण्यासाठी सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही, कारण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नावात दुरुस्ती करू शकता.

Ration Card। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
रेशन कार्डमधील चुकांमुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांना मोफत किंवा स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागते. हेच लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन पोर्टलवर नाव दुरुस्तीची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या (NFSA) मदतीने केवळ काही मिनिटांत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून रेशन कार्डमधील नाव कसे दुरुस्त करायचे, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

पूर्वी रेशन कार्डमधील नाव दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा रेशनिंग ऑफिसमध्ये सरकारी चकरा माराव्या लागायच्या. पण आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाईन केली आहे. आता तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर करून रेशन कार्डमधील नाव अगदी काही मिनिटांत दुरुस्त करू शकता.

ऑनलाईन नाव दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • रेशन कार्डवरील नाव दुरुस्त करण्यासाठी अर्ज करताना तुमच्याकडे खालीलपैकी किमान एक वैध कागदपत्र असणे आवश्यक आहे.
  • 1. आधार कार्ड: ज्या सदस्याचे नाव दुरुस्त करायचे आहे, त्याचे अचूक नाव असलेले आधार कार्ड.
  • 2. ओळखपत्र: मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड.
  • 3. शाळा सोडल्याचा दाखला (LC): वयाचा आणि अचूक नावाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
  • 4. अधिकृत प्रतिज्ञापत्र: नावामध्ये मोठा बदल करायचा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र लागते.
  • 5. विवाह नोंदणी प्रमाणपत्र: लग्नानंतर महिलांचे नाव बदलायचे असल्यास विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ऑनलाईन दुरुस्तीची सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

  • स्टेप 1: सर्वात आधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या (NFSA) अधिकृत वेबसाईटवर (nfsa.gov.in) जा किंवा तुमच्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या (उदा. महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in) पोर्टलला भेट द्या.
  • स्टेप 2: होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ‘Ration Card’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘Apply for Online Modification/Correction’ किंवा ‘Citizen Services’ चा पर्याय निवडा.
  • स्टेप 3: आता तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून लॉगईन करावे लागेल. मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
  • स्टेप 4: लॉगईन झाल्यानंतर तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची नावे स्क्रीनवर दिसतील. ज्या सदस्याच्या नावात चूक आहे, त्या नावापुढील ‘Edit’ किंवा ‘Correction’ या बटनावर क्लिक करा.
  • स्टेप 5: आता उघडलेल्या फॉर्ममध्ये योग्य स्पेलिंगसह अचूक नाव टाईप करा. (नाव मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये व्यवस्थित तपासून घ्या).
  • स्टेप 6: यानंतर, नावाचा अचूक पुरावा म्हणून तुमचे आधार कार्ड किंवा वरीलपैकी आवश्यक ते कागदपत्र स्कॅन करून PDF किंवा JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • स्टेप 7: सर्व माहिती पुन्हा एकदा नीट तपासून घ्या आणि ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

अर्जाची स्थिती कशी तपासायची?

अर्ज सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर एक ‘रिफ्रन्स नंबर’ (Reference Number/Acknowledgement Number) जनरेट होईल. हा नंबर कुठेतरी लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या नंबरच्या मदतीने तुम्ही ‘Track Application Status’ या पर्यायावर जाऊन तुमच्या अर्जाची मंजुरी कुठपर्यंत आली आहे, हे ऑनलाईन तपासू शकता.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा