Weather Alert: राज्यात उष्णेतची लाट अजून तीव्र झाली असताना बुधवारी साताऱ्याला पावासने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. येत्या काही दिवसांत उष्णेतची लाट येत असतानाच पावासाचीही शक्यता आहे.

मुख्य रस्त्यांवर पाण्याचे लोट
बुधवारी सकाळपासूनच प्रचंड उष्णता आणि तापमानाचा पारा वाढत गेल्यामुळे सातारकरांना घरात बसणेही असह्य झाले होते. त्यातच विजेचा लपंडाव सुरू होता. दुपारी साडेतीननंतर अचानक आकाशात काळोख दाटून येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह पडणाऱ्या या पावसाने संपूर्ण वातावरण अंधारून गेले. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले. वादळी वारे आणि जोरदार विजांमुळे नागरिक भयभीत झाल्याचे चित्र होते. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. शहरातील अनेक मुख्य रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड लोट वाहून अक्षरश: तळी निर्माण झाली होती. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात गुरुवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेच्या स्टेज; तसेच प्रेक्षक गॅलरी उभारणीत या पावसामुळे मोठा व्यत्यय आला.
Monsoon Prediction: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून आगमनाचा यंदापासून स्थानिक अंदाज, महिनाभर आधीच कळणार तारीख!
Monsoon Prediction: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून आगमनाचा यंदापासून स्थानिक अंदाज, महिनाभर आधीच कळणार तारीख!
शहरानजीकच्या परळी भागातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, कैऱ्यांचा सडा झाडांखाली पडल्याचे दिसून येत होते. काढणीला आलेला उन्हाळी भुईमूग व इतर पिकांनाही याचा मोठा फटका बसला.
पुण्यात किमाम तापमानाचा उच्चांक
शहरात एकीकडे कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे रेंगाळलेला असताना, आता किमान तापमानातही दोन दिवसांत वाढ झाली आहे. दिवसा रस्त्यावर उन्हाचे चटके आणि रात्री गरम हवेमुळे वाढलेल्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. एरवी मध्यरात्रीनंतर हवेत जाणवणारा गारवाही सध्या नसल्याने उकाडा असह्य होतो आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी, शहरातील कमाल तापमानात थोडी घट झाली होऊन ३९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानात वाढ होऊन २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या हंगामातील हे उच्चांकी किमान तापमान ठरले आहे.
उत्तरेकडील राज्यांकडून येणाऱ्या उष्णवाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात सरासरीपेक्षा जास्त जाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती आहे. आकाश निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे, हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. परिणामी एकीकडे पुणेकरांना मान्सून पूर्व पावसाचे वेध लागले असताना नागरिक सध्या दिवसरात्र उकाडा-उन्हाचे चटके अनुभवत आहेत. शहराबरोबरच, उपनगर आणि जिल्ह्यांमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. गावांमध्ये दुपारी लोक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. पुण्यात उष्माघाताच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार आहे आणि आकाश निरभ्र असेल. सध्या तरी शहरात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
गुरूवारीही पावसाची शक्यता?
दरम्यान, नागपुरात उष्णेतचा चटका कायम असला तरी रात्री पावसाने हजरे लावली. विदर्भात येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता असून नागपुरात हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावासाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात उष्णता कायम राहणार आहे.

