Headlines

भारतीय वंशाच्या दोन युवा बुद्धिबळपटूंचा डंका; 11 वर्षांच्या बोधनाने रचला इतिहास, 17 वर्षीय श्रेयसही चॅम्पियन


British Chess Championship 2026: भारतीय वंशाच्या ११ वर्षीय बोधना शिवानंदन आणि १७ वर्षीय श्रेयस रॉयल यांनी ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. बोधनाने सर्वात तरुण महिला चॅम्पियन होण्याचा मान मिळवला, तर श्रेयसनेही विजेतेपद पटकावले.

Bodhana Sivanandan Shreyas Royal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या दोन युवा बुद्धिबळपटूंनी ब्रिटनमध्ये मोठा इतिहास रचला आहे. ११ वर्षीय बोधना शिवानंदन आणि १७ वर्षीय श्रेयस रॉयल यांनी २०२६च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बोधनाने ब्रिटनची आतापर्यंतची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तर श्रेयसनेही पुरुषांच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावत आपली छाप पाडली.

११ वर्षांची बोधना ठरली ब्रिटनची सर्वात तरुण चॅम्पियन

रविवारी झालेल्या रोमांचक रॅपिड प्लेऑफमध्ये बोधनाने आयर्लंडच्या १४ वर्षीय त्रिशा कन्यामरालाचा पराभव केला. या विजयासह तिने ब्रिटिश महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी बोधनाला मोठा पाठिंबा दिला. तिच्या नावाने घोषणाही करण्यात आल्या.

इंग्लिश चेस फेडरेशनचे समालोचक ग्रँडमास्टर डॅनी गॉर्मली यांनीही तिच्या प्रतिभेचे कौतुक केले. बोधनासारखी प्रतिभा एखाद्या पिढीतून क्वचितच पाहायला मिळते, असे त्यांनी म्हटले.

Maharashtra TimesSourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी, महिनाभरापासून सुरु होता गंभीर प्रकार; पोलिसांत तक्रार दाखल

लॉकडाऊनमध्ये सुरू झाला बुद्धिबळाचा प्रवास

बोधनाने कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिच्या वडिलांच्या मित्रांनी भारतात जाताना काही बॅग्स त्यांच्या घरी ठेवल्या होत्या. त्यामध्ये असलेल्या बुद्धिबळाच्या पटावरून तिच्या या प्रवासाला सुरुवात झाली.

विजयानंतर बोधनाने सांगितले की, बुद्धिबळाच्या सोंगट्या तिला आकर्षक वाटल्या आणि म्हणून तिने खेळायला सुरुवात केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न करत राहायला हवे, असेही तिने म्हटले.

श्रेयस रॉयलचाही मोठा पराक्रम

याच स्पर्धेत १७ वर्षीय श्रेयस रॉयलनेही विजेतेपद पटकावले. नवव्या फेरीनंतर त्याने गुणतालिकेत आघाडी घेतली होती. त्याने इंग्लंडच्या अनुभवी ग्रँडमास्टर्सना अर्ध्या गुणाने मागे टाकत एकूण गुणांच्या आधारावर विजेतेपद मिळवले.

Maharashtra TimesNarender Berwal : ‘मला नरेंदर नावाची चीड’, PM मोदींसमोरच भारतीय बॉक्सर असं का म्हणाला? शेवटला मोदींनाही आवरलं नाही हसू
विशेष म्हणजे बोधनाचा या चॅम्पियनशिपमधील एकमेव पराभव सहाव्या फेरीत श्रेयसविरुद्ध झाला होता.

१२२ वर्षांच्या इतिहासातील मोठी स्पर्धा

२०२६ची ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही स्पर्धेच्या १२२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक ठरली. यंदा १,७५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी एकूण ३४ हजार पौंडांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली होती.

बोधनाने यापूर्वी यूके ओपन महिला ब्लिट्झ चॅम्पियन आणि संयुक्त ब्रिटिश महिला चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. आता क्लासिकल प्रकारातील विजेतेपदामुळे तिच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.