Headlines

प्रबाेधनात्मक उपक्रम:लोकप्रतिनिधींनी कायद्यांसह नियम, सभागृह कार्यपद्धतीचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक




मनपाच्या कामकाजात जनप्रतिनिधींची भूमिका अधिक प्रभावी, सक्षम आणि जबाबदार करण्याच्या उद्देशाने मनपा आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने नगरसेवक व नगरसेविकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. शनिवारी ८ ऑगस्टला सकाळी १० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी सभागृह येथे ही कार्यशाळा झाली. महापालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना विविध कायदे, नियम, अधिनियम, सभा कार्यपद्धती, प्रशासकीय प्रक्रियेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या सभागृहात प्रभावीपणे मांडणे, प्रश्न उपस्थित करणे, विविध विषयांवर चर्चा करणे, महापालिकेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना आवश्यक असलेले ज्ञान मिळावे, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते केले. या वेळी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, गटनेते शेख हमीद शेख वाहेद यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. महापालिका ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची महत्त्वाची यंत्रणा आहे. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, पथदिवे, नागरी सुविधा, विकासकामे यासह विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधींना प्रशासनासोबत समन्वय साधून काम करावे लागते. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही माहिती असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले. कार्यशाळेतील आणखी एका सत्रात सभा कार्यपद्धती, सभाशास्त्र व प्रश्न यावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी नगरसचिव ॲड. महबूबखां पठाण यांनी मार्गदर्शन केले. सभागृहातील कामकाज कशा पद्धतीने चालते, सभेतील नियमांचे पालन कसे करावे, विविध विषयांवर चर्चा करताना कोणत्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे, प्रश्न उपस्थित करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, सभागृहातील लोकप्रतिनिधींची भूमिका कशी असावी, याबाबत त्यांनी माहिती दिली. सभागृहातील कामकाज अधिक शिस्तबद्ध, प्रभावी, नियमबद्ध पद्धतीने करण्यासाठी सभाशास्त्राचे ज्ञान महत्त्वाचे असल्याचे या वेळी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यासाठी असलेल्या कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेचे ज्ञानही आत्मसात करावे, यावर भर दिला. आजच्या डिजिटल युगात समाजमाध्यमे ही नागरिकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम बनली आहेत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांतील संवाद अधिक जलद व व्यापक करण्यासाठी समाजमाध्यमांचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कार्यशाळेत लोकप्रतिनिधींसाठी समाजमाध्यमांचे व्यवस्थापन यावर संस्थेच्या व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे नगरसेवक व नगरसेविकांना महापालिका अधिनियम, सभागृहातील कार्यपद्धती, प्रश्न मांडण्याची प्रक्रिया, सभाशास्त्र, आधुनिक समाजमाध्यमांच्या प्रभावी वापराबाबत उपयुक्त माहिती मिळाली. महापालिकेतील कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणात सहभागी नगरसेवक, नगरसेविकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करताना स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नवनवीन ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कायदे, नियम, सभागृहाची कार्यपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य वापर करून नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत