Headlines

पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रकल्पाचे घोडे अडकले कुठे ? भूमिपूजनाला दोन वर्ष होत आली ; प्रकल्प रखडल्याची चर्चा


Nagpur News : पेर्नोड रिकार्ड इंडिया या मद्य उत्पादक कंपनीच्या नागपूरजवळील वसाहतीतील प्रकल्पाला काही मुहूर्त मिळेना. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला दोन वर्षे होत आली असून देखील याला विलंब होत आहे. परवानग्यांमुळे प्रकल्प रखडल्याची चर्चा आहे.

_ नागपूर बातम्या,पेर्नोड रिकार्ड इंडिया प्रकल्प
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : उद्योग विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, पर्यावरण विभागाच्या परवानग्यांमुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. तर, काहींच्या मते पर्यावरणविषयक परवानग्या मिळाल्या असून इतर बाबींमुळे प्रकल्प सुरू होण्यास उशीर होत आहे. एकीकडे राज्य सरकार प्रकल्पांना गती देण्याचा आग्रह धरत असताना, दुसरीकडे मोठे प्रकल्प विविध कारणांनी रखडत असल्याने औद्योगिक प्रगतीला अडथळा निर्माण होत असल्याची भावना औद्योगिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही.

पेर्नोड रिकार्ड इंडिया या जागतिक मद्य उत्पादक कंपनीच्या नागपूरजवळील अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाच्या भूमिपूजनाला जवळपास दोन वर्षे होत आली; मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विविध परवानग्यांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब होत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाला असाच विलंब होत राहिला, तर नियोजित मुदत पाळली जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Maharashtra TimesNagpur Doctors Strike: निवासी डॉक्टरांचा संप अधिक तीव्र ;आजपासून आप्तकालीन सेवांवरही परिणाम

८८ एकर जागा वाटप

अतिरिक्त बुटीबोरीतील हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठी माल्ट स्पिरिट डिस्टिलरी आणि मॅच्युरेशन सुविधा म्हणून ओळखला जात आहे. पुढील दहा वर्षांत या प्रकल्पात सुमारे १,७८५ कोटी ते २,५०० कोटी रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक होणार आहे. अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी परिसरात कंपनीला ८८ एकर जागा वाटप करण्यात आली आहे.

या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता१.३ कोटी शुद्धअल्कोहोल लिटर इतकी असेल. म्हणजेच दररोज सुमारे ६० हजार लिटर माल्ट स्पिरिट निर्मिती होणार आहे. प्रकल्पामुळे सुमारे ७०० ते ८०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. वाहतूक, पॅकेजिंग आणि पुरवठा साखळीच्या माध्यमातून हजारो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया

माल्ट उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या जवाच्या शेतीला प्रोत्साहन देण्याचेही नियोजन आहे. स्थानिक पातळीवर तसेच महाराष्ट्रात कंत्राटी शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानासह झीरो लिक्विड डिस्चार्ज प्रणालीचा वापर होणार असून, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.

Maharashtra TimesVikhroli Crime : मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन वाद, विक्रोळीत सख्ख्या भावाचा दादाच्या कुटुंबावर हल्ला, बापलेकाचा मृत्यू, आई-धाकटा लेक जखमी

अद्याप स्पष्ट माहिती नाही.

नागपूरचे मध्यवर्ती स्थान, समृद्धी महामार्ग आणि मिहानशी असलेली कनेक्टिव्हिटी यामुळे देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठांपर्यंत उत्पादन पोहोचविणे कंपनीसाठी सोयीचे ठरणार आहे. फेब्रुवारी २०२४मध्ये महाराष्ट्र सरकार आणि पेर्नोड रिकार्ड इंडिया यांच्यात या प्रकल्पाबाबत करार झाला होता. ऑक्टोबर २०२४मध्ये प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. प्रकल्पाची डिझाइन आणि लेआउट प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा