सावंतवाडी / प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगेली सावरवाड येथील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच उसनवारी तत्त्वावर कार्यरत असलेले शिक्षक सुनील परशराम करडे यांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करून घ्यावे; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालकांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी एस. जी. शेर्ले यांची भेट घेऊन दिला.
पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेतील गणित व विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक सुनील परशराम करडे हे सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), सिंधुदुर्ग येथे उसनवारी तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेत पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे.
सध्या कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त वर्गांचा भार पडत असून सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढा वेळ व शैक्षणिक मार्गदर्शन देणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून करडे यांना तातडीने शाळेत परत रुजू करावे किंवा पर्यायी पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी सभापती रवींद्र मडगावकर, सरपंच देवयानी पवार, सविता ठाकूर, अमृता काळे, अनिता सावंत, कविता पाटील, रूपाली देऊळकर, शीतल कुडतरकर, तन्वी कुडतरकर, विलास मोरजकर, साईनाथ देऊळकर यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी एस. जी. शेर्ले यांनी या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तातडीने पत्रव्यवहार करून शाळेस शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकांना दिले. पालकांनी निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक व तातडीने विचार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शाळेस एक अतिरिक्त पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
