![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत सडकून टीका केली. राज्यातील आदिवासी भागात होणारा भ्रष्टाचार, आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेले मृत्यू, खाण माफियांचा सुळसुळाट आणि शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी या सर्वच मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारचे वाभाडे काढले. आश्रमशाळेतील मृत्यू आणि आदिवासी मंत्र्यांवर निशाणा आदिवासी भागांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत राऊत यांनी संताप व्यक्त केला. “काल एका आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे. यापुढे अशा दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी निश्चित करून, संबंधित खात्याच्या मंत्र्याला तत्काळ बडतर्फ करावे,” अशी मागणी राऊत यांनी केली. “आदिवासी मंत्री धर्मारावबाबा आत्राम आणि नरहरी झिरवळ मंत्रिमंडळात बसून करतात तरी काय? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि नगरविकास खात्यांमध्ये मोठी लूटमार आणि दरोडे पडतच असतात, पण निदान आदिवासींना तरी यातून सोडा,” असा घणाघात त्यांनी केला. खाण माफियांच्या ट्रकखाली १५०० आदिवासी चिरडले राऊत यांनी खाण माफियांच्या मुद्द्यावरून सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “१५०० आदिवासी आणि त्यांची मुले खाण मालक आणि उद्योजकांच्या ट्रकखाली चिरडली गेली आहेत. यासंदर्भात आदिवासींचे एक शिष्टमंडळ मला दिल्लीत येऊन भेटले. या घटनांचे पुरावे नष्ट करण्याचे काम केले जात असून, रक्तावर पाण्याच्या फवारण्या केल्या जात आहेत,” असा दावा राऊत यांनी केला. “खाण उद्योजकांना जो जिल्हाधिकारी हवा असतो, तोच तिथे आणला जातो. हे अधिकारी सरकारचे प्रतिनिधी नसून खाण मालकांचे ‘पगारी नोकर’ असल्यासारखे काम करतात. मी लवकरच त्या भागाचा दौरा करणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले” शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर राऊत यांनी समाधान व्यक्त केले. “न्यायालय ज्या गांभीर्याने आमचा युक्तिवाद ऐकून घेत आहे, त्यावरून मला न्यायालयाकडून न्यायाचीच अपेक्षा आहे. आम्हाला संविधान आणि कायद्यानुसार योग्य न्याय हवा आहे. निवडणूक आयोगावर प्रचंड दबाव होता, त्यामुळे त्यांनी चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले आहे. चुकीच्या हातात गेलेले हे पक्षचिन्ह त्यांच्याकडून काढून घेतले पाहिजे,” असे राऊत म्हणाले. मोदी-शाहांना संसदेत येण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, “मोदी आणि शाह एवढे घाबरले आहेत की, त्यांना संसदेत येण्याचे धाडसच होत नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होऊन १६-१७ दिवस झाले आहेत, आता फक्त दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे ते आता संसदेत येतील असे मला वाटत नाही.” राज ठाकरेंच्या भेटीत विशेष काय? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि त्यावरून रंगलेल्या राजकीय चर्चांवरही राऊत यांनी भाष्य केले. “राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, यात विशेष असे काही नाही. ते राज्याच्या समस्या, विशेषतः खड्ड्यांचा विषय घेऊन त्यांना भेटायला गेले असतील,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. हेही वाचा.. राज ठाकरे सकाळीच थेट ‘वर्षा’वर:मुख्यमंत्री फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक, राजकीय चर्चांना पुन्हा उधाण गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर सातत्याने टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचला. भाजपवर आक्रमक भूमिका घेत असतानाच राज ठाकरेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा
Source link
निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले!:शिवसेना सुनावणी आणि संसदेतील मोदी-शहांच्या अनुपस्थितीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
