Headlines

तुमचे बँक खाते बिना OTP चे रिकामे होऊ शकतात, 5 गोष्टींपासून आधीच सावध व्हा! । Maharashtra Times


डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की, जोपर्यंत आपण OTP सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअरसारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्डशिवाय थेट तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Fraud without OTP। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा OTP येणार नाही आणि तुमचे बँक खाते रिकामे होईल. हो. हे घडू शकतं. कारण, असे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युझर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. एआय व्हॉईस क्लोनिंग, पब्लिक Wi-Fi चा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युझर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले असून वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत. मात्र, या सोयीसोबतच सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढला आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, जोपर्यंत आपण कोणाला आपला वन-टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही, तोपर्यंत आपले बँक खाते सुरक्षित आहे.

मात्र, सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्यामध्ये कोणताही OTP न मागता थेट तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल’ आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

1.सिम स्वॅपिंगचा धोका

हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचे बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क गायब होते आणि बँक खात्याशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खाते रिकामे होते. त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी संपर्क साधा.

2. मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स

हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये ‘मालवेअर’ नावाचा धोकादायक व्हायरस किंवा ‘AnyDesk’ आणि ‘TeamViewer’ सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाऊनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच ओटीपी चोरून व्यवहार पूर्ण करतात.

3. AI व्हॉईस क्लोनिंग

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधला आहे. तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि “मी मोठ्या संकटात अडकलो आहे, तातडीने पैसे पाठव,” अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता किंवा ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून खात्री करा.

4. पब्लिक Wi-Fi

रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक Wi-Fi वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क्स सुरक्षित नसतात. हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते ‘मॅन-इन-द-मिडल’ (MITM) हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा.

5. UPI Auto-Debit नियम

अनेकदा आपण विविध ॲप्सचे सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ‘ऑटो-डेबिट’ (Auto-Debit) किंवा ‘मँडेट’ (Mandate) सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ॲपला चुकून असा ॲक्सेस दिला असेल, तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तुमच्या युपीआय ॲपमधील ‘Autopay’ सेक्शनमध्ये जाऊन असे अनधिकृत ॲक्सेस त्वरित ब्लॉक करा.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा