द्रमुकच्या भ्रष्टाचाराची फाइल योग्यवेळी उघडणार
वृत्तसंस्था, चेन्नई
तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री स्टॅलिन आणि द्रमुकवर निशाणा साधला. द्रमुक आमदारांच्या गोंधळादरम्यान विजय यांनी आपल्याकडे मागील द्रमुक सरकारशी निगडित भ्रष्टाचाराच्या दोन फाइल्स असून योग्यवेळी त्या उघडणार असल्याचा इशारा दिला. मला आताच त्या फाइल्स उघडण्यास भाग पाडू नका असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.
टीव्हीकेच्या आमदारांनी रस्तेनिर्मितीतील घोटाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यादरम्यान सत्तारुढ आणि विरोधी आमदारांदरम्यान शाब्दिक चकमक झाली. विजय यांनी हस्तक्षेप करत द्रमुक सरकारच्या काळातील फाइल्स उघडण्याचा इशारा दिला.विजय सरकार भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणा डीव्हीएसीच्या अंतर्गत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार असून याकरता 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
डीव्हीएसीकडे सध्या भ्रष्टाचाराशी निगडित सोशल मीडिया माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. अशास्थितीत नवे केंद्र या तक्रारींना अन् सोशल मीडिया पोस्टना रिकॉर्ड करेल, जेणेकरून सोशल मीडियावरून कंटेंट हटविण्यात आल्यावरही आवश्यक पुरावे सुरक्षित राहू शकतील. केंद्राची टीम 24 तास सोशल मीडियावर नजर ठेवेल. सर्वसामान्यांच्या तक्रारी, व्हिसलब्लोअरकडून समोर आणली गेलेली माहिती आणि भ्रष्टाचाराशी निगडित व्हायरल पोस्ट आणि व्हिडिओचे निरीक्षण केले जाईल.
