Headlines

गुंतवणुकीतून भरपूर नफा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 80 लाखांची फसवणूक


सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

गुंतवणूक करा, भरपूर नफा मिळवा, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी अथणी येथील एका व्यावसायिकाला तब्बल 80 लाख रुपयांना ठकविले आहे. यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस त्या भामट्यांचा शोध घेत आहेत.

केवळ अथणीच नव्हे तर मुधोळ, हारुगेरी आदी ठिकाणी या व्यावसायिकाची व त्यांच्या कुटुंबीयांची बँक खाती आहेत. या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी 80 लाख 86 हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून भरून घेऊन नफा तर नाहीच जमा केलेली रक्कमही परत न करता त्यांची फसवणूक केली आहे.

अथणी येथील एका व्यावसायिकाच्या परिचिताने गेल्या महिन्यात एक मोबाईल नंबर देऊन या नंबरवर संपर्क साधा, त्यांना मेसेज करा, ते सांगतील त्या पद्धतीने गुंतवणूक करा, आपणही त्यांच्याकडे गुंतवणूक केली आहे, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून 5 जुलै रोजी सायबर गुन्हेगारांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हाय असा मेसेज केला.

त्यावेळी सायबर गुन्हेगारांनी गुंतवणूक कशी करायची, नफा कसा मिळवायचा, याची माहिती देत एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करताच लाँगटर्म वेल्थ क्लब नामक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये या व्यावसायिकाच्या मोबाईल क्रमांकाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांना वैयक्तिक स्वरुपातही गुंतवणुकीचे फायदे किती आहेत, याची माहिती देण्यात आली.

ऑपस्टॉक्स वन ऑन वन व्हीआयपी सर्व्हिस नामक आणखी एका व्हॉट्सअॅप ग्रुपला व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्यात आला. त्या ग्रुपवरही गुंतवणुकीचे फायदे सांगून त्यांचे मोबाईल क्रमांक, पासवर्ड, लॉगईन अकौंट नंबर, पॅनकार्डची माहिती मागविण्यात आली. या ग्रुपमध्ये डिपॉझिट अॅण्ड विड्रॉवल फंड डिटेल्स असे आयकॉन दिसत होते.

ऑपस्टॉक्स डीएमए एक्सक्लुजिव्ह सर्व्हिस ग्रुप नामक आणखी एका व्हॉट्सअॅप ग्रुपला समाविष्ट करून 6 ते 27 जुलैपर्यंत व्यावसायिक, त्याची पत्नी व भावाच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 80 लाख 86 हजार रुपये गुंतवणुकीसाठी जमा करण्यात आले. ही रक्कम जमा झाल्यानंतर नफा तर नाहीच, गुंतवलेली रक्कमही न देता सायबर गुन्हेगारांनी त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ज्यांनी या व्यावसायिकाला गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. सायबर गुन्हेगारांनी त्यालाही तब्बल 80 लाखांचा गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली असून बागलकोट पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत