Headlines

निवड समिती अध्यक्षपदी आगरकरच्या जागी लक्ष्मण ?


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे आणि त्यांना बीसीसीआयकडून आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या जागी महान फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगरकर यांचा कार्यकाळ या वर्षी जूनमध्ये संपला होता, परंतु त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संघ व्यवस्थापनाशी चांगले संबंध निर्माण झाल्यामुळे मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज असलेले आगरकर 2027 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकापर्यंत या पदावर कायम राहतील, असे वाटत होते. मात्र गेल्या महिन्यात इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवांवरून निर्माण झालेल्या वादामुळे या महत्त्वाच्या पदावर कायम राहण्याची इच्छा असूनही आगरकर यांचे भवितव्य आता अनिश्चित झाले आहे.

आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर, 2023 ते मार्च, 2026 या काळात निवडलेल्या भारतीय संघांनी चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यापैकी तीन स्पर्धा जिंकल्या. यात दोन टी-20 विश्वचषक आणि एका आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात निवड समितीने अनेक कठोर निर्णय घेतले. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हळूहळू बाजूला करणे यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी एक धाडसी निर्णय घेत कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कर्णधार शुभमन गिल याला टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळले होते.

लक्ष्मण हे डिसेंबर, 2021 पासून बेंगळूर येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कोचिंग स्टाफवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यांनी भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. 2024 मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे व्यवस्थापन त्यांनी केले होते. तसेच राहुल द्रविड जेव्हा वरिष्ठ संघासोबत एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी व्यस्त होते तेव्हा 2023 मध्ये हांगझाऊ येथील आशियाई खेळांत आणि गेल्या महिन्यात झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावलेली आहे. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमधील आइची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही लक्ष्मण यांची भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इंग्लंड दौऱ्यातील घडामोडींनी बदलली परिस्थिती

इंग्लंडच्या अलीकडील दौऱ्यादरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींनी परिस्थिती बदलली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी अशी बातमी आली होती की, इंग्लंडमधील मालिकेनंतर रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार आहे. परंतु त्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी निवड समितीच्या अध्यक्षांशी सल्लामसलत न करताच असे विधान केले की, जोपर्यंत रोहित संघाच्या योजनांचा भाग असेल तोपर्यंत तो खेळत राहील. एका वृत्तानुसार, त्यानंतर रोहितने झळकावलेल्या शतकामुळे परिस्थिती सुलभ होण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची झाली. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे काही पदाधिकारी आता ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे क्रिकेट प्रमुख असलेल्या लक्ष्मण यांची निवड समितीचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत. सदर वृत्तात असेही नमूद केले आहे की, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना लक्ष्मण यांच्या मतांना अधिक आदर मिळेल आणि रोहित शर्मा व विराट कोहली यासारखे वरिष्ठ खेळाडू त्यांच्याशी अधिक सकारात्मकपणे संवाद साधतील, असे वाटत आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे.

-अजित आगरकर यांना आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी

-इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वादामुळे बदलली परिस्थिती

-आगरकर यांच्या कार्यकाळात भारताने आयसीसीच्या चारपैकी तीन स्पर्धा जिंकल्या

-आगरकर यांनी शमी, गिल यांच्यासंदर्भात घेतले काही धाडसी निर्णय

 

-व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रशिक्षकपदाचा, सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमुख म्हणूनही मोठा अनुभव

 

 

 

 

 

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत