Headlines

ओमानजवळ आणखी एका जहाजावर हल्ला, चालक दलामध्ये 20 भारतीयांचा समावेश, यावेळी भारतानेही घेतली आक्रमक भूमिका


Edited byManali Sagvekar|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

MT Jalveer Ship Attack Near Oman Coast: ओमानच्या खाडीत व्यापारी जाहाजांवरील हल्ले सुरूच असून, सेटेबेलोवरील अमेरिकन हल्ल्यात 3 भारतीय खुलाशांच्या मृत्यूनंतर आता एमटी जलवीर जहाजावरही आणखी एक हल्ला झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.

ओमानजवळ आणखी एका जहाजावर हल्ला, चालक दलामध्ये 20 भारतीयांचा समावेश
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
MT Jalveer Attack: ओमानच्या किनाऱ्याजवळ आणखी एका मालवाहू जहाजावर हल्ला करण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याआधी 10 जून रोजी; बुधवारी एमटी सेटेबेलो या जहाजावर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये 24 भारतीय खलाशांचा क्रू होता. आता गुरुवारी पुन्हा एमटी जलवीर या जहाजावर हल्ला झाल्याची चर्चा आहे. अवघ्या एका दिवसात अशी दुसरी घटना घडल्यामुळे दोन्ही बाजूला मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी जहाजावर आग लागली, ही आग इंजिन आणि फ्युनल भागात पसरली. या जहाजावर चालक दलामध्ये भारतीय नाविकही सामील असल्याची माहिती असून, ओमानमधील भारतीय दूतवास या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

शिनास बंदरगाहाजवळ घडली घटना

दरम्यान, ओमानमधील भारतीय दूतावासाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) या घटनेची माहिती दिली. दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ओमानच्या शिनास बंदरगाहाजवळ एमटी जलवीर जाहाजाबाबत घडलेल्या घटनेची आम्हाला गुरुवारी सकाळी माहिती मिळाली. आम्ही या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असून, अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक ओमान प्रशासनाशी आणि अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधून आहोत.’

या आधीही घडली होती अशीच घटना

एमटी जलवीर वरील हा हल्ला होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच बुधवारी, ओमानच्या खाडीत सेटेबेलो या तेलवाहू टँकरवर अमेरिकेकडून लष्करी हल्ला करण्यात आला होता. या सेटेबेलो जाहाजावरील हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची पुष्टी केंद्रीय जहाजबांधणी आणि बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवारी केली. या आधीच्या हल्ल्यानंतर तीन भारतीय नाविक बेपत्ता झाले होते, ज्यांचा या लष्करी कारवाईत मृत्यू झाला आहे. सेटेबेलो टँकरवर एकूण 24 भारतीय नागरिक स्वार होते, त्यापैकी 21 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

भारताचा अमेरिकेकडे तीव्र निषेध

गेल्या 24 तासात घडलेल्या या हृदयद्रावक घटनांमुळे भारताने अत्यंत आक्रमक आणि कडक राजनैतिक निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीने अमेरिकेचे प्रभारी जेसन मीक्स यांना तात्काळ समन्स बजावून परराष्ट्र मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत आणि या हल्ल्यांबाबत तीव्र निषेध नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेच्या या लष्करी कारवाईवर आणि व्यापारी जहाजांवरील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताची अत्यंत गंभीर चिंता अमेरिकेसमोर मांडली.

पश्चिम आशियातील संघर्ष कारणीभूत?

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवदेनात ओमानच्या किनारपट्टीवर व्यापारी जहाजांवर होणाऱ्या या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाचा आणि संघर्षाचा थेट परिणाम या व्यापारी मार्गांवर होत असून, व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. आता एमटी जलवीरवर नुकत्याच जालेल्या हल्लयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या सागरी मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

Manali Sagvekar

लेखकाबद्दलManali Sagvekarमनाली सुनील सागवेकर या सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये डिजिटल विभागात कन्सलटंट म्हणून कार्यरत असून, त्या एक अनुभवी तरुण पत्रकार आहेत. विरार (पश्चिम) येथील विवा महाविद्यालयातून ‘मल्टीमीडिया आणि मास कम्युनिकेशन’ (BAMMC) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात स्वतःची ओळख निर्माण केली. सध्या मटा ऑनलाइनसाठी बिझनेस आणि आंतरराष्ट्रीय विषयक बातम्यांसाठी लेखन करत आहेत.मनाली यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात सकाळ मिडिया ग्रुपममधून केली. त्यानंतर ‘साम टीव्ही’च्या डिजिटल न्यूज रूममध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करताना त्यांनी चालू घडामोडींवर तसेच सविस्तर बातम्यांवर काम केले. डिजिटल माध्यमांसाठी लागणारा वेगवान मजकूर तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘झी 24 तास’ सारख्या नामांकित संस्थेत राजकारण, महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विषयावरील बातम्या केल्या आहेत.मनाली यांना लेखनासोबतच तांत्रिक बाबींचेही उत्तम ज्ञान आहे. त्या VN आणि InShot सारख्या टूल्सचा वापर करून प्रभावी व्हिडिओ एडिटिंग करतात, तसेच त्यांना QuarkXPress आणि Google Workspace यांसारख्या आधुनिक कंटेंट मॅनेजमेंट टूल्सचाही सराव आहे.मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रगल्भता यामुळे त्या जागतिक स्तरावरील बातम्यांचे स्थानिक भाषेत अचूक रूपांतर करण्यास सक्षम आहेत. सोशल मीडिया ट्रेंड्सची जाण आणि वाचकांना गुंतवून ठेवणारी लेखनशैली ही त्यांची जमेची बाजू आहे. सातत्याने बदलणाऱ्या डिजिटल मीडियाच्या जगात विश्वासार्ह आणि संशोधनात्मक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून त्या आपल्या प्रगल्भ लेखनाने आणि विविध विषयांवरील पकडीने वाचकांशी संवाद साधत आहेत.आणखी वाचा