इराण – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल चार महिन्यांनंतर सुरुवात झाली आहे. अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान २८ फेब्रुवारी २०२६ रोजी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हवाई हल्ल्यात ८६ वर्षीय खामेनी यांचा मृत्यू झाला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांचा अंत्यविधी पुढे ढकलण्यात आला होता. आता तेहरानमध्ये लाखो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून, जगभरातून मोठ्या संख्येने लोक आणि परदेशी प्रतिनिधी इराणमध्ये दाखल झाले आहेत.
या अंत्ययात्रेदरम्यान तेहरानचे रस्ते ‘अमेरिकेचा नाश असो’, ‘इस्रायलचा नाश असो’ आणि ‘बदला’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले. हातात इराणी राष्ट्रध्वज आणि ऐक्याचे संदेश असलेले फलक घेऊन नागरिकांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. अंतिम दर्शनासाठी अनेकांनी तासनतास रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या हवाई हल्ल्यात खामेनी यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे मुख्य कफनपेटीसोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या कफनपेट्याही अंत्ययात्रेत सहभागी करण्यात आल्या असून, सर्वांवर शासकीय आणि धार्मिक इतमामात एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खामेनी यांच्या पार्थिवावर ९ जुलै रोजी इराणमधील मशहद शहरातील शिया मुस्लिमांचे पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या इमाम रेझा दर्गा परिसरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.दरम्यान, या ऐतिहासिक अंत्यसंस्कारासाठी १०० हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आणि वरिष्ठ प्रतिनिधी इराणमध्ये दाखल झाले आहेत. भारताकडूनही अधिकृत शिष्टमंडळ या अंत्यविधीस उपस्थित असून, बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांचा त्यामध्ये समावेश आहे.
