आधार कार्डवर नाव किंवा त्याचे स्पेलिंग चुकले असल्यास आता शासकीय कार्यालयात किंवा आधार केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी घरबसल्या नाव दुरुस्त करण्याची सुविधा दिली आहे. मोबाईल नंबर लिंक असलेल्या युजर्सना केवळ 50 रुपयांच्या शुल्कात ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

तुमच्याही आधार कार्डवर नाव चुकले असेल, तर काळजी करण्याची किंवा आधार केंद्रावर तासनतास रांगेत उभे राहण्याची अजिबात गरज नाही. ही ऑनलाईन प्रोसेस नक्की काय आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
ऑनलाईन नाव बदलण्यासाठी किंवा स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी एका वैध कागदपत्राचा स्कॅन केलेला फोटो (JPEG किंवा PDF फॉरमॅट) असणे आवश्यक आहे.
नाव दुरुस्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- 1. पॅन कार्ड
- 2. पासपोर्ट
- 3. ड्रायव्हिंग लायसन्स
- 4. मतदार ओळखपत्र
- 5. रेशन कार्ड
- 6. गॅझेट सर्टिफिकेट
ऑनलाईन नाव दुरुस्तीची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
- स्टेप 1: सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला (myaadhaar.uidai.gov.in) भेट द्या.
- स्टेप 2: होम पेजवर असलेल्या ‘Login’ बटनवर क्लिक करा. तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP टाकून लॉगिन करा.
- स्टेप 3: लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्डवर अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ‘Address & Name Update’ किंवा ‘Update Aadhaar Online’ या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप 4: आता ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता दुरुस्त करण्याचे पर्याय दिसतील. त्यातील ‘Name’ या पर्यायावर क्लिक करून पुढे जा.
- स्टेप 5: स्क्रीनवर तुमचे जुने नाव दिसेल. त्याच्या खाली दिलेल्या रकान्यात तुमचे नवीन बरोबर नाव आणि अचूक स्पेलिंग टाईप करा. तुम्ही इंग्रजीत टाईप करताच स्थानिक भाषेत (मराठीत) नाव स्वयंचलितपणे टाईप होईल. मराठीतील स्पेलिंग व्यवस्थित तपासून घ्या.
- स्टेप 6: तुमचे बरोबर नाव टाईप केल्यानंतर, ते सिद्ध करण्यासाठी वर नमूद केलेल्या वैध कागदपत्रांपैकी (उदा. पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) एक निवडा आणि त्याचा स्पष्ट फोटो किंवा पीडीएफ फाईल अपलोड करा.
- स्टेप 7: सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून ‘Submit’ करा. या ऑनलाईन सेवेसाठी UIDAI कडून 50 ऑनलाईन फी आकारली जाते. तुम्ही यूपीआय, नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे हे पेमेंट करू शकता.
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक SRN (Service Request Number) मिळेल. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. साधारणपणे 1 ते 2 आठवड्यांत तुमचे नाव ऑनलाईन अपडेट होते आणि तुम्ही नवीन डिजिटल आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

