Headlines

Woman passenger suffers heart attack st conductor saves life with cpr incident at chhatrapati sambhajinagar bus station; बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव; छ. संभाजीनगरमधील थरार


Chhatrapati Sambhajinagar News: दोघांच्या प्रसंगवधानाने आणि योग्य वेळेत मिळालेल्या संजीवनीमुळे महिलेच्या छातीचे ठोके आणि थांबलेली श्वसनक्रिया पुन्हा पूर्ववत होण्यास मदत झाली.

st bus stand
बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत असलेल्या एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ती जमिनीवर कोसळली. या अनपेक्षित घटनेनं स्थानकात एकच खळबळ उडाली. मात्र, तेथे कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या एका महिला वाहकाने कसलाही विचार न करता आणि क्षणाचाही विलंब न करता दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिला प्रवाशाला नवे जीवन मिळाले आहे. महिला वाहक संगीता पालवे यांनी तातडीने दिलेला ‘सीपीआर’ आणि प्राथमिक उपचार यामुळे महिलेची थांबलेली श्वसनक्रिया पुन्हा सुरू झाली असून, या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील मध्यवर्ती बसस्थानकात एक महिला प्रवासी प्रवासासाठी आली होती. स्थानकातील फलाटावर उभी असतानाच अचानक तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. छातीत वेदना होऊन काही क्षणांतच ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. हे दृश्य पाहताच बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

महिला वाहक संगीता पालवे ठरल्या देवदूत

महिलेची खालावलेली स्थिती आणि थांबलेले ठोके पाहताच तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला वाहक संगीता पालवे यांनी जराही वेळ न घालवता तातडीने पुढे होऊन महिलेला ‘सीपीआर’ देण्यास सुरुवात केली. त्यांनी तिच्या छातीवर ठराविक गतीने दाब देऊन कृत्रिम श्वासोच्छवास सुरू केला.स्थानकातील सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही संगीता पालवे यांना या कठीण प्रसंगात मोठी मदत केली.

घाटी रुग्णालयात केले दाखल; कर्मचाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

महिलेचा श्वास पूर्ववत झाल्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून तिला तातडीने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे हलवले, अशी माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली आहे. एनआयसीयूमध्ये तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी दिलेला सीपीआर एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे. वाहक संगीता पालवे आणि सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांच्या या मानवी, संवेदनशील आणि धाडसी कृत्याबद्दल एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा