Headlines

शहरात डेंगी , गॅस्ट्रो , न्युमोनियाचा त्रास ;दमेकऱ्यांचा त्रास वाढला


Chhatrapati Sambhajinagar News: सध्या सगळीकडे पावसाने चांगलाच जोर धरलायं त्यामुळे वातावरण चांगलच बदललयं या वातावरणाचा परिणाम म्हणजे आता अनेक आजार डोक वर काढतात.यांमुळे शहरात डेंगी , गॅस्ट्रो , न्युमोनियाचा त्रास डोकवर काढत आहे.

व्हायरस
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: मागच्या आठ दिवसांत डेंगी, गॅस्ट्रो, दमा, न्यूमोनियाचा त्रास वाढला असून, सगळ्याच रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) निम्मे रुग्ण हे विषाणूजन्य आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. झपाट्याने होणाऱ्या संसर्गाच्या दाट शक्यतेमुळेच आजारी बालकांना शाळेत न पाठवण्याचे आवाहनही तज्ज्ञांनी केले. दमेकऱ्यांनी त्यांचे इन्हेलर्स व औषधे काटेकोरपणे घ्यावीत, याकडेही जाणकारांनी लक्ष वेधले आहे.

विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले

यंदा उशिरा का होईना शहर परिसरात व जिल्ह्यात याच महिन्याच्या म्हणजे जुलैच्या प्रारंभी पाऊस सुरू झाला. अर्थात, सुरुवातीचा पाऊस अगदीच तुरळक होता. मात्र मागच्या काही दिवसांत बऱ्यापैकी पाऊस होत आहे व सलगपणे होत आहे. तर, दुसरीकडे पावसाबरोबर विषाणूजन्य आजारांनी डोके चांगलेच वर काढले आहे. सद्यस्थितीत सर्वच रुग्णालयांच्या ओपीडीतील निम्मे रुग्ण हे विषाणूजन्य आजारांचे असल्याचेही वैद्यकतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

डेंगीसदृश्य रुग्ण

आणखी उल्लेखनीय म्हणजे मागच्या काही आठवड्यांपासून शहर परिसरात डेंगीसदृश रुग्ण अल्प प्रमाणात दिसून येत असले तरी, अशा रुग्णांची संख्या आता वाढली आहे. या संदर्भात शहरातील नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर म्हणाले, मागच्या तीन महिन्यांपासून गॅस्ट्रोचे बालरुग्ण पाहायला मिळत आहेत; शिवाय आता डेंगीसदृश रुग्णही आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे डेंगीसदृश रुग्णांची संख्या वाढू शकते, अशीही शक्यता डॉ. सावळेश्वरकर यांनी व्यक्त केली.

बालकांमध्ये हाय ग्रेड फिव्हर

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास रोटे यांच्यानुसार, सध्या काही बालकांमध्ये हाय ग्रेड फिव्हर, अंगावर पुरळ येणे अशी डेंगीची लक्षणे हमखास दिसून येत आहेत. श्वसनविकार वाढले आहेत व विषाणूजन्य न्यूमोनियाही वाढल्याचे जाणवत आहे. सर्दी-खोकला-ताप अशी सर्वसामान्य लक्षणे असलेल्या बालकांची संख्या अर्थातच सर्वाधिक असल्याचे डॉ. रोटे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Maharashtra TimesMumbai News: महामुंबईला तिहेरी गती! मेट्रो, लिंक रोड आणि दुहेरी बोगद्यांच्या कामाला गती; ऑगस्टपासून प्रवासात दिलासा मिळणार

औषधे व इन्हेलर्स घेणे गरजेचे आहे

बाहेर राज्यात प्रवास करून परतलेल्यांमध्ये श्वसनविकार, न्यूमोनिया व इतर त्रास वाढत असल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. आशिष देशमुख म्हणाले. दमा असलेल्यांना न्यूमोनियाची शक्यता जास्त असते आणि त्यामुळेच दमेकऱ्यांनी त्यांची औषधे व इन्हेलर्स घेणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Maharashtra TimesFriendship Day News : मैत्रीच्या नात्याला भेटवस्तूंचा साज ;देखण्या भेटवस्तूंनी बाजारपेठ बहरली ,फ्रेंडशिप दिनानिमित्त बाजारात उत्साह

श्वसनविकारतज्ञांचा सल्ला

“दमा असलेल्यांनी तसेच व्याधीग्रस्तांनी इन्फ्युएन्झाची लस घेणेगरजेचे आहे. ज्येष्ठांनी व कुठला ना कुठला ना आजार असलेल्यांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. लस ही याच खबरदारीचा महत्त्वाचा भाग आहे.” -डॉ. आशिष देशमुख , श्वसनविकारतज्ञ

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा