Woman Stuck in Moksha Passage: तमिळनाडूतील गिरी अन्नामलैयार मंदिरातील ‘मोक्ष मार्गा’तून गेल्यास मोक्ष मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला त्या अरुंद मार्गात अडकलेली दिसत असून, इतर भाविक तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये धार्मिक श्रद्धा आणि अशा प्रथांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मोक्ष मिळवण्यासाठी करावा लागतो खडतर प्रवास
हा व्हिडीओ @amshilparaghu या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नामलाई येथील गिरी अन्नामलैयार मंदिरात घडली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आठवडाभरापूर्वीच याच मार्गातून जाताना ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरी देखील ‘मोक्ष मार्गा’तून जाणाऱ्या भाविकांची संख्या काही कमी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही महिलाही आपल्या लठ्ठ शरीरामुळे या अरुंद मार्गात अडकली होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिचा श्वास अक्षरशः कोंडला आहे. कितीही प्रयत्न करूनही तिला बाहेर येणं शक्य होत नाही. अखेर आजूबाजूच्या लोकांनी मदत केल्यामुळे तिचा जीव वाचला.
व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
हा व्हिडीओ १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. तसंच, काही जणांनी मोक्ष मिळवण्यासाठी जिवंतपणी असा जीवघेणा खेळ करणं योग्य नसल्याचंही म्हटलं आहे. तिरुवन्नामलाई येथील या मंदिरात ‘मोक्ष मार्गा’तून गेल्यास मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा नसून ही केवळ एक धार्मिक मान्यता आहे.

