Headlines

Vijay wadttewar and majadev jankar mass rally for demand of separate column for obcs in caste census; सरकारची डोकेदुखी वाढणार; आरक्षण नव्हे, वेगळ्या मुद्द्यावर निघणार ओबीसींचा महामोर्चा


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात आलेला नाही. ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची धोरणे आखली जावीत, यासाठी जातिनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असलाच पाहिजे. या मागणीसाठी ओबीसी समाजातील सर्व संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने व्यापक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान, जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा या मागणीसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय भव्य ओबीसी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

सकल ओबीसी महामोर्चाच्यावतीने मंगळवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी मंत्री महादेव जानकर, कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर, सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांतील ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन या मोर्चाची तारीख आणि पुढील नियोजन निश्चित केले जाणार आहे.या आंदोलनाच्या नियोजनासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेते, खासदार व आमदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. ओबीसी मंत्री आणि ओबीसी लोकप्रतिनिधींनीही केंद्र सरकारपर्यंत समाजाच्या भावना पोहोचवाव्यात,यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ओबीसींच्या सहाशे जाती असताना आकडेवारीत लाखो नोंदींचे आकडे कसे आले, हा गंभीर प्रश्न आहे. ओबीसींची खरी संख्या कळणार नसेल तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात धोरणे, आरक्षण आणि योजनांचा लाभ कसा मिळणार, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.