Tukaram Mundhe FDA reaction on if anyone tried to bribe him; एफडीएच्या कारवाईवेळी तुम्हाला कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला का? तुकाराम मुंढे यांचं नकारार्थी उत्तर, लाचखोरांना मोलाचा सल्ला
Tukaram Mundhe FDA reaction on if anyone tried to bribe him; एफडीएच्या कारवाईवेळी तुम्हाला कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला का? तुकाराम मुंढे यांचं नकारार्थी उत्तर, लाचखोरांना मोलाचा सल्ला
Tukaram Mundhe on bribe : महाराष्ट्रात अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सुरु केलेल्या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर, कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला
तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रात अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सुरु केलेल्या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर, कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मला लाच देण्याचे धाडस कोणी करेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. ज्यांना असा विचार करायचा आहे त्यांनी “१०० वेळा विचार करावा” असा सल्लाही त्यांनी दिला.
लाच देणाऱ्यांनी १०० वेळा विचार करावा
तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवायांचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई केल्यामुळे त्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ वाहिनीवरील एका मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे म्हणाले की “माझ्या बाबतीत लाच देण्याचे धाडस कोणी करेल असे मला वाटत नाही. जर कोणी तसा विचार करत असेल, तर त्यांनी १०० वेळा विचार करावा.”
कठोर स्वभाव असल्याच्या प्रतिमेबद्दल विचारले असता, तुकाराम मुंढे यांनी कबूल केले की अनेकदा त्यांना “अहंकारी” संबोधले जाते किंवा इतरांचे न ऐकल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. “अनेक जण मला अहंकारी समजतात; मी अहंकारी नाही, तर मी स्पष्टवक्ता आहे. स्पष्टवक्तेपणा आणि अहंकार यांच्यात खूपच पुसटशी रेषा असते” असे ते म्हणाले.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, आपल्या पदाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडताना प्रामाणिक आणि पारदर्शक राहणे हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. “आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि आपण काय केले आहे, याबद्दल आपण प्रामाणिक आणि पारदर्शक आहोत का? जर त्यात यश आले तर उत्तमच; आणि नाही आले, तरी किमान मी प्रयत्न तर केला” असे ते म्हणाले.
माझं काम जगावेगळं नाही
अनेकांसाठी प्रेरणास्थान मानले जात असूनही, तुकाराम मुंढे यांनी आपल्या कृती असाधारण असल्याचं मानण्यास नकार दिला. “मला नाही वाटत की हे काही खरोखर प्रेरणादायी आहे किंवा मी काही असाधारण काम केले आहे. माझ्या मते, माझ्या पदाकडून जी अपेक्षा आहे, तेच काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही” असे मुंढे म्हणाले.
“जर आपण सर्वांनी आपल्याकडून अपेक्षित असलेल्या भूमिका योग्यरित्या पार पाडल्या, तर मला वाटते की आपण एक खरोखरच उत्तम समाज बनू शकतो” असं मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलं.
राजकारणातील संभाव्य कारकीर्दीबाबतच्या चर्चांवर भाष्य करताना तुकाराम मुंढे म्हणाले की, त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे ते कदाचित राजकारणासाठी योग्य ठरणार नाहीत. “माझ्यासारखी व्यक्ती – जी अत्यंत स्पष्टवक्ती आणि सचोटीने वागणारी आहे – तिला राजकारणात स्वीकारले जाईल असे मला वाटत नाही” असे मुंढे म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा