Headlines

Thane Couple Sameer Joshi Aparna Joshi Missing in Nepal Flood kin waits for message; मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेर


Thane Joshi Couple Missing : कितीतरी मेसेज पाठवले तरी सिंगल ‘टिक’ येतेय… फोन कुठे असेल? चार्ज नसेल झालेला का? नेटवर्क नसेल का? काहीच कळत नाही… मुंबईच्या ग्रुपसोबत गेलेल्यांपैकी कुणाशीही संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांची घालमेल सुरु आहे

Nepal Flood Sameer Aparna Joshi Couple Missing Maharashtra Times
समीर आणि अपर्णा जोशी, ठाणे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कितीतरी मेसेज पाठवले तरी एकच ‘टिक’ येतेय… फोन कुठे असेल? चार्ज झालेला नसेल का? नेटवर्क नसेल का? काहीच कळत नाही… मुंबईच्या गटासोबत गेलेल्यांपैकी कुणाशीही संपर्क होत नाहीये… नेपाळमधील पुरानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांची अशीच घालमेल सुरू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ८५ भारतीयांची सुटका झाल्याची माहिती मिळाली असली, तरी महाराष्ट्रातील, त्यातही प्रामुख्याने मुंबई, पुण्याच्या एका गटातील पर्यटकांबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे एखादा तरी फोन येईल, कुठूनतरी काहीतरी कळेल, या आशेवर नातेवाईक आहेत. ठाण्यातील समीर जोशी व अपर्णा जोशी यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.

आप्तांच्या वाटेकडे कुटुंबीयांचे डोळे

आपल्या बेपत्ता नातेवाईकांची माहिती मिळेल, या आशेने त्यांनी दोन दिवसांमध्ये भारतातील संपर्क क्रमांकांपासून नेपाळ, चीन येथील मिळालेल्या प्रत्येक नंबरवर कित्येकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अद्याप संपर्क न झालेल्या या गटातील रजनीश नातू यांच्या घरीही सध्या हीच स्थिती असल्याचे त्यांच्या एका स्नेह्यांनी सांगितले. कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर बेपत्तांबाबत माहिती मिळेल, यासाठी सतत टीव्ही वाहिन्या बदलत, वेबसाइट तपासत ते फोनकडे डोळे लावून बसले आहेत.

ठाण्याचे सतीश पाटणकर आणि त्यांच्या पत्नी रेखा पाटणकर यांचाही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या भगिनी, मुले परदेशात असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नातेवाईकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीकडे ते नजर लावून बसले आहेत.

Maharashtra TimesSanjana Agarwal : खूप गिल्टी वाटतंय, रक्षाबंधनाला केतनच्या आठवणीत संजनाला अश्रू अनावर, सियाला मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटचं कारण सांगितलं

दोन डॉक्टर अडकले

अंधेरीतील डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे नेपाळमध्ये अडकले आहेत. डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ असल्याची माहिती रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.

माहिती मिळवण्यासाठी मदतीचे आवाहन

ठाण्यातील समीर जोशी व अपर्णा जोशी यांच्याशी दोन दिवसांपासून संपर्क होत नाही. त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करून, त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यास कळवण्याचे आवाहन त्यांच्या स्नेह्यांनी केले आहे. जोशी हे ‘रिचा ट्रॅव्हल्स’ सोबत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आहेत. ज्यांनी त्यांना पाहिले असेल, सोबत प्रवास केला असेल, त्याच सुमारास सीमा ओलांडली असेल, अशा व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एक गट आज नेपाळमध्ये परतणार

मुंबईहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या मैत्री ग्रुप्सचे ६८ ते ७० पर्यटक यात्रेकरू शनिवारी तिबेटमधून नेपाळमध्ये पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडली, तेव्हा त्यांचा गट यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात होता. मात्र आपत्तीमुळे परतीचे मार्ग बंद झाले. आता नेपाळ आणि चीनने कोदारी सीमामार्ग सुरू केल्याने या मार्गाने सुखरूप असलेले पर्यटक परत येतील.

प्रलयाच्या कारणांचा शोध सुरू

नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरातून काही धडे मिळाले आहेत. मुख्यत्वे, हिमालयाच्या प्रदेशातील धोके समजून घेऊन ते कमी करण्यासाठी आणि भू-वापर धोरण विकसित करण्यासाठी हिमनद्यांचे पद्धतशीर व वैज्ञानिक मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘या दुर्घटनेमागे हवामान बदलाशी संबंधित कारण आहे. बर्फाचे आच्छादन कमी होत आहे, हिमनद्या आटत आहेत. परिणामी, खडकाळ किंवा ओसाड भाग समोर येत आहेत. ते अधिक उष्णता शोषून घेतात. त्यामुळे उतार अधिक असुरक्षित बनत आहेत,’ असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesNepal Flood : डॉ. चितळेंसह ग्रुप नेपाळ महापुरावेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावर, रिचा ट्रेक्सची माहिती, गंभीर फटका बसल्याची भीतीनेपाळमधील भोटेकोशी नदीकाठी आलेल्या प्रलयाला हिमनग कोसळणे आणि हिमस्खलन कसे कारणीभूत ठरले असावे, याचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. राडारोड्यामुळे ल्हेंडे नदीचा प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा आणि त्यामुळे भूस्खलनाचा बंधारा तयार होऊन नंतर फुटला असावा, असे संकेत प्राथमिक विश्लेषणातून मिळत आहेत.