![]()
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा अचानक ताबा सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या कार, ट्रकसह लहान-मोठ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तब्बल 6 ते 7 वाहने एकमेकांवर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 2 ते 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 ते 10 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी (दि. 28 ऑगस्ट ) मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. त्याचवेळी एका ट्रकचा अचानक ताबा सुटला. वेगात असलेल्या या ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनांना मागून धडक देण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच एकापाठोपाठ 6 ते 7 वाहने या अपघातात सापडली.धडका जोरदार असल्याने काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही वाहनांमध्ये प्रवासी अडकून पडले होते. त्यामुळे घटनास्थळी बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलीस, महामार्ग पोलीस आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत आणि जखमींची अधिकृत संख्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातातील वाहने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण काय? ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, याचा तपास चांदवड पोलीस करत आहेत. ट्रकचा वेग जास्त होता का, चालकाचे नियंत्रण सुटण्यामागे काही अन्य कारण होते का किंवा ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का, या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हेही वाचा.. खाकी वर्दीतच संपवलं जीवन:हिंगोलीत रेल्वेसमोर उडी घेत पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या, पोलिस दलात खळबळ हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.सविस्तर वाचा..
Source link
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 3 ठार:ट्रकचालकाचा ताबा सुटला; 6 ते 7 वाहनांना उडवले
