Headlines

Sarpanch mangesh sable serious allegations against cm devendra fadnavis osd over manoj jarange patil agitation; जरांगेंचे आंदोलन मोडण्यासाठी ज्या हॉटेल्समध्ये बैठका झाल्या, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे; मंगेश साबळेंचे फडणवीसांच्या OSD वर गंभीर आरोप



सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: गेवराई पायगाचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. ही नोटीस हाती पडल्यानंतर मंगेश साबळे यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस यंत्रणेसह गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा थेट आरोप केला आहे.

शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६(१)(अ)(ब) नुसार ही नोटीस बजावण्यात आली असून, ५ दिवसांच्या मुदतीत चौकशीसाठी हजर राहून बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नोटीसमध्ये पोलिसांनी काय म्हटलंय?

पोलीस प्रशासनाने दिलेल्या नोटीसमध्ये मंगेश साबळे यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आणि विविध गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख केला आहे.

– ८ गंभीर गुन्हे: साबळे यांच्यावर सिटीचौक, क्रांतीचौक, जवाहरनगर आणि फुलंब्री पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांनुसार ८ गुन्हे नोंदवण्यात आले असून काही प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाले आहे.

– शासकीय कामात अडथळा अन् दंगा: सरकारी कार्यालयांमध्ये बेकायदेशीरपणे जमाव जमवून गोंधळ घालणे, प्रशासकीय कामकाज ठप्प करणे, अधिकाऱ्यांना ओलीस धरणे आणि आत्मदहनाचा इशारा देऊन दहशत निर्माण करणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवले आहेत.

– अधिकारी व व्यापाऱ्यांना धमकावणे: सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणे, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोकरीवरून घालवण्याच्या धमक्या देणे, खंडणी उकळणे आणि दादागिरी करणे अशा अनेक तक्रारी गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांतून पुढे आल्याचे नमूद केले आहे.

– २ वर्षांसाठी तडीपारीची शिफारस: या सर्व गुन्हेगारी हालचालींमुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार करण्याची कारवाई सुचवली आहे.

तडीपारीच्या नोटिशीवर मंगेश साबळे यांची आक्रमक प्रतिक्रिया

आमदार होण्याच्या स्वप्नासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करत मंगेश साबळे यांनी म्हटलं आहे की, “पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि डीसीपी पंकज आतुलकर यांनी माझ्याच गावातील दोघांवर दबाव आणून ही तक्रार दाखल करून घेतली आहे. या संपूर्ण कारवाईला राजकीय दुर्गंधी येत असून मुख्यमंत्र्यांचे ओएसडी त्यांना रसद पुरवत आहेत. स्वतःला आमदार व्हायचे आहे म्हणूनच मला या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा हा प्लॅन रचला गेला आहे. पण मला दोन वर्षे काय, दहा वर्षे तडीपार केले तरी माझी नाळ इथल्या जनतेशीच जुळलेली राहील,” असा दावा साबळे यांनी केला.

“मनोज जरांगेंविरोधातील कटाचे पुरावे माझ्याकडे”

प्रशासनाला थेट इशारा देताना मंगेश साबळे म्हणाले, “मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कोणत्या हॉटेल्समध्ये बैठका झाल्या, काय काय कारस्थाने शिजली आणि माझ्याकडे काय ऑफर्स आल्या, याचे सगळे पुरावे माझ्याकडे जमा आहेत. मी अजून तोंड उघडलेले नाही; पण जर मी बोलू लागलो, तर ही जनता तुम्हाला रस्त्यावर पळवून पळवून मारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, “गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलल्यामुळे जर व्यवस्थेचे फटके बसणार असतील, तर मी तडीपार व्हायला तयार आहे. मात्र एका मंगेश साबळेला जिल्ह्यातून काढाल, तर मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून हजारो मंगेश साबळे उभे करेन. संभाजीनगरमधून तडीपार झालो, तर संपूर्ण राज्यात ‘भीक मागू आंदोलन’ छेडून असच काम करणार ,” असा इशाराही मंगेश साबळे यांनी दिला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत