Headlines

Sankashti Chaturthi july modak recipe


संकष्टी चतुर्थी म्हटलं की प्रत्येक गणेशभक्ताच्या घरी मोदकांचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही. भगवान गणेशाला सर्वाधिक प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. अनेक जण बाजारातील तांदळाचे पीठ वापरून मोदक तयार करतात. मात्र, घरी असलेल्या तांदळापासूनच कोणतेही तयार पीठ न वापरता मऊ, पांढरेशुभ्र आणि चविष्ट उकडीचे मोदक बनवता येतात. योग्य प्रमाण आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर नवशिक्यांनाही अगदी सुंदर कळ्या असलेले मोदक सहज तयार करता येतात. Priyas Kitchen यांनी ही रेसिपी शेअर केली आहे.

Sankashti Chaturthi modak recipe
फोटो सौजन्य :- @Priyas Kitchen
संकष्टी चतुर्थी म्हटलं की प्रत्येक गणेशभक्ताच्या घरी मोदकांचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही. भगवान गणेशाला सर्वाधिक प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. त्यामुळे संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थी किंवा इतर कोणत्याही गणेश पूजनाच्या दिवशी अनेक घरांमध्ये आवर्जून उकडीचे मोदक बनवले जातात. मऊ उकड, गूळ-खोबऱ्याचे रसाळ सारण आणि हाताने घातलेल्या सुंदर कळ्या यामुळे या मोदकांची चव अधिकच खुलते.

अनेक जण बाजारातील तांदळाचे पीठ वापरून मोदक तयार करतात. मात्र, घरी असलेल्या तांदळापासूनच कोणतेही तयार पीठ न वापरता मऊ, पांढरेशुभ्र आणि चविष्ट उकडीचे मोदक बनवता येतात. योग्य प्रमाण आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर नवशिक्यांनाही अगदी सुंदर कळ्या असलेले मोदक सहज तयार करता येतात. विशेष म्हणजे घरच्या घरी तयार केलेल्या तांदळाच्या पिठामुळे उकड अधिक मऊ आणि लवचिक होते, त्यामुळे मोदक फाटण्याची शक्यता कमी होते.

या रेसिपीमध्ये फक्त एक कप इंद्रायणी तांदूळ वापरून उकड तयार केली जाते. या प्रमाणात साधारण 11 मोदक तयार होतात. मोदकांची उकड मऊ, सारण रसाळ आणि कळ्या सुंदर याव्यात यासाठी प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक करण्याची गरज असते. उकड योग्य प्रकारे मळणे, सारणाचे योग्य प्रमाण ठेवणे आणि वाफवण्याची वेळ पाळणे या छोट्या-छोट्या गोष्टी मोदक परफेक्ट बनवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. (फोटो सौजन्य :- @Priyas Kitchen)

लागणारे साहित्य

लागणारे साहित्य

उकडीसाठी
1 कप इंद्रायणी तांदूळ
1 कप पाणी
2 चमचे साजूक तूप
चवीनुसार मीठ

सारणासाठी
2 कप ओल्या नारळाचा चव
1 कप गूळ
पाव चमचा वेलची-जायफळ पावडर
1 चमचा खसखस

तांदळापासून पीठ कसे तयार करावे?

तांदळापासून पीठ कसे तयार करावे?

सर्वप्रथम इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुऊन 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी पूर्णपणे काढून तांदूळ स्वच्छ कापडावर 20 ते 30 मिनिटे पसरून ठेवा. तांदूळ पूर्ण कोरडे करू नका, त्यामध्ये किंचित ओलावा राहू द्या. यानंतर मिक्सरमध्ये तांदूळ अगदी बारीक वाटून घ्या. हे पीठ चाळणीने चाळून घ्या. जर काही जाड कण उरले असतील तर ते पुन्हा वाटून चाळा. अशा प्रकारे तयार केलेले ताजे तांदळाचे पीठ मोदकांसाठी अधिक मऊ आणि चविष्ट ठरते.

स्वादिष्ट सारण कसे तयार कराल?

स्वादिष्ट सारण कसे तयार कराल?

एका जाड बुडाच्या कढईत ओल्या नारळाचा चव आणि गूळ एकत्र घ्या. मंद आचेवर सतत हलवत राहा. गूळ वितळल्यानंतर मिश्रण थोडे घट्ट होऊ लागेल.यानंतर त्यात वेलची-जायफळ पावडर आणि खसखस घाला. सर्व साहित्य नीट मिसळून 4 ते 5 मिनिटे शिजवा. सारण खूप कोरडे किंवा खूप पातळ ठेवू नका. योग्य घट्टपणा आला की गॅस बंद करून ते पूर्ण थंड होऊ द्या.

मऊ उकड तयार करण्याची योग्य पद्धत

मऊ उकड तयार करण्याची योग्य पद्धत

एका पातेल्यात एक कप पाणी गरम करा. त्यामध्ये साजूक तूप आणि चवीनुसार मीठ घाला. पाणी उकळू लागल्यावर तयार केलेले तांदळाचे पीठ एकदम घालून हलक्या हाताने मिसळा.गॅस मंद ठेवा आणि दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर हे मिश्रण एका मोठ्या ताटात काढून घ्या.उकड कोमट असतानाच हाताला थोडे तूप किंवा पाणी लावून ती 8 ते 10 मिनिटे चांगली मळा. उकड जितकी मऊ मळली जाईल तितके मोदक सुंदर तयार होतात.

संकष्टी चतुर्थी उकडीचे मोदक रेसिपी

मोदकाच्या कळ्या पाडण्याची सोपी पद्धत

मोदकाच्या कळ्या पाडण्याची सोपी पद्धत

अनेकांना मोदक बनवताना कळ्या पाडणे सर्वात अवघड वाटते. मात्र योग्य पद्धत वापरली तर हे काम अतिशय सोपे होते.उकडीचा छोटा गोळा घ्या आणि तो हाताने हलक्या दाबाने वाटीसारखा आकार द्या. कडा शक्य तितक्या पातळ ठेवा आणि मध्यभाग थोडा जाड राहू द्या.आता तयार केलेले नारळ-गुळाचे सारण मध्यभागी भरा.यानंतर अंगठा आणि तर्जनीच्या मदतीने छोट्या-छोट्या घड्या (कळ्या) तयार करा. सर्व कळ्या एकसमान झाल्यानंतर त्या वरच्या बाजूला एकत्र आणून हलक्या हाताने बंद करा. सरावाने कळ्या अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू लागतात. सुरुवातीला कमी कळ्या पडल्या तरी चिंता करण्याची गरज नाही.

मोदक वाफवण्याची योग्य पद्धत

मोदक वाफवण्याची योग्य पद्धत

मोदक पात्र किंवा इडली कुकरमध्ये पाणी गरम करा. चाळणीला किंवा मोदक पात्राला केळीचे पान किंवा हलके तूप लावा.तयार केलेले मोदक एकमेकांना न चिकटता ठेवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे वाफवा.मोदकाचा रंग किंचित पारदर्शक दिसू लागला की ते व्यवस्थित शिजले आहेत, असे समजा.

मोदक मऊ होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

मोदक मऊ होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
  • इंद्रायणी तांदूळ वापरल्यास उकड अधिक मऊ होते.
  • तांदळामध्ये थोडासा ओलावा ठेवूनच वाटा.
  • उकड कोमट असतानाच मळा.
  • कडा शक्य तितक्या पातळ ठेवा.
  • सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदक भरा.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा