Headlines

Sanjay Shirsat Meets Abhijeet Dipke Family In Chhatrapati Sambhajinagar Security Demand CM Fadanvis ; ठाकरेंकडून अभिजीतचं कौतुक, आता शिंदेंचा शिलेदारही सरसावला, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी करणार, वडिलांची प्रतिक्रिया काय?


Abhijeet Dipke Security : सीजेपीमुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला झुकवलं. त्यांच्यामागे उभा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या रेट्याने अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण आता दिपके संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी समोर आली आहे.

minister sanjay shirsat meets abhijeet dipke family
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून महिनाभर आंदोलन उभारणाऱ्या अभिजीत दिपकेच्या संघर्षाला मोठे यश आले आहे. या आंदोलनात अनेक राजकीय नेते पुढारी पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी दिल्लीत पोहोचत अभिजीतच्या कामाचे कौतुक केले होते. त्यानंतरही ते त्याच्या सातत्याने संपर्कात होते. आज मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चाही पार पडला. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटत असतानाच, आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी अभिजीतच्या वडिलांशी संवाद साधला.

‘अभिजीतच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार’

कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “अभिजीतला भेटायला मी अगोदरच येणार होतो, मात्र त्या वेळी येण्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले असते, म्हणून मी ही भेट टाळली होती. आज अभिजीतला खूप मोठे यश मिळाले असून, तो माझ्याच मतदारसंघातील तरुण आहे. माझ्या मतदारसंघातील एखादा मुलगा राष्ट्रीय स्तरावर एवढं मोठं यश मिळवतो, तेव्हा त्याला भेटणे आणि त्याच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्यच आहे.”

पुढे बोलताना शिरसाट यांनी अभिजीतच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, “अभिजीत येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या गावी परत येईल. तो जेव्हा महाराष्ट्रात दाखल होईल, तेव्हा त्याच्या जिवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्याला शासकीय संरक्षण दिले जावे, अशी विशेष मागणी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.”

विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

या आंदोलनाच्या आधारे राजकारण करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधताना शिरसाट म्हणाले, “केंद्र सरकारने अभिजीतच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आणि म्हणूनच त्याला हे यश मिळाले आहे. मात्र, या आंदोलनाच्या आणि अभिजीतच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी व पक्षांनी स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे काम केले.” तसेच, ‘इंडिया’ आघाडीत कसलीही एकवाक्यता नसून, दिल्लीतील आंदोलनाचे श्रेय लाटण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू होती, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘१५ वर्षे सोबत काम केले, पण त्यांनी आज उत्तर दिले’ – भगवान दिपके

पालकमंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर अभिजीतचे वडील भगवान दिपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आंदोलनाच्या काळात अनेक नेत्यांनी मला फोन केले, घरी येऊन भेट घेतली. पण ज्यांच्यासोबत मी १५ वर्षे काम केले, तेच पालकमंत्री मला भेटत का नाहीत किंवा फोन का करत नाहीत, असा प्रश्न मला पडला होता. मात्र, त्यांनी आज स्वतः येऊन त्या प्रश्नाचे उत्तर दिले.”

“आंदोलन सुरू असताना मी येथे आलो असतो, तर त्याचे राजकीय भांडवल झाले असते, ही त्यांची भूमिका मला योग्य वाटली. आज ते आमच्या घरी आले, याचा खूप आनंद आहे. अभिजीत दोन-तीन दिवसांत घरी येईल, तो आल्यावरच आंदोलनाची पुढची दिशा आणि भूमिका काय असेल, यावर बोलणे योग्य ठरेल,” असे भगवान दिपके यांनी स्पष्ट केले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा