अलका वाळूजकर42 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

वडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच डोंगरावरून पडून मृत्यू झाला. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर गेला हे पाहून तिथे असलेल्या त्या मुलाच्या आईनेही त्याच डोंगरावरून काही क्षणाच्या आत उडी घेत आपले जीवन संपवले.
कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19), मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48) आणि संगीता मुरलीधर चांदगुडे (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आणि एका संपूर्ण कुटुंबाचा झालेला करुण अंत मन सुन्न करणारा आहे. या पार्श्वभूमीवर, समुपदेशक अलका वाळूंजकर यांनी मांडलेले मानसशास्त्रीय विश्लेषण समाज आणि पालकांसाठी डोळे उघडणारे आहे. वाचा या विशेष लेखातून…
आजकाल सकाळी उठून बातम्या वाचताना मनात एक अनामिक धाकधूक (Fear) असते. काहीतरी अघटीत वाचायला मिळणार की काय, अशी भीती वाटते. शनिवारी, 21 ऑगस्ट 2026 च्या सकाळी अशीच एक हृदयद्रावक बातमी नजरेसमोर आली. तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून एका 19 वर्षीय मुलाने आणि त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. हे वाचून मन सुन्न झाले. मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही, मृत्यूच्या साध्या विचाराने भलेभले घाबरतात; मग या 19 वर्षांच्या मुलाला त्याची भीती कशी वाटली नसेल? एवढी हिंमत त्याच्यात कुठून आली असेल? काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले..!
मरणाची ही भावना एवढी वरचढ (Overpower) कशी झाली? आता समाजाने खडबडून जागे होण्याची वेळ आली आहे. यासाठी सुजाण पालकत्व, उत्तम नातेसंबंध, संवेदनशील समाज, आयुष्यामध्ये उद्दिष्ट निश्चिती, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी, शिस्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सारासार बुद्धी या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे. आत्महत्येचे विचार किंवा कृती यामध्ये भावनांचा आवेग वरचढ ठरतो. भावनांच्या नियमनाची (Emotional Regulation) सवय नसेल तर हे कोणत्याही वयात घडू शकते.
या घटनेचा केंद्रबिंदू केवळ ‘आयफोन’ किंवा भौतिक वस्तू नसून, आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध, त्यातून होत असलेले कौटुंबिक कलह आणि या सर्व गोष्टींचा मुलावर झालेला मानसिक परिणाम असू शकतो. कारणे कोणतीही असली तरी, कोणतीही अतिरेकी गोष्ट करताना भान नसणे ही गोष्ट केंद्रस्थानी येते. कोणत्याही अतिरेकी विचारांमागे ‘अपेक्षा–नकार–निराशा–भावनिक असंतुलन–आवेगपूर्ण कृती’ असा घटनाक्रम असतो.
मात्र, अशा घटनेचे विश्लेषण करताना एका कारणावर निष्कर्ष न काढता अनेक मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बातमीत वाचल्यानुसार त्या कुटुंबामध्ये मागील 6 वर्षांपासून कलह होता. हा गृहकलह घरातील कोणत्याही सदस्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक ठरतो.

घरातील कलह आणि मनावर होणारे संभाव्य परिणाम (Domestic Conflict and Its Impact on Mind)
1. दीर्घकालीन ताण आणि अति-सतर्कता (Chronic Stress आणि Hyperarousal):
घरात सतत भांडण, ओरडणे, अपमान किंवा तणाव असेल तर मुलाची मज्जासंस्था (Nervous System) सतत ‘धोक्याच्या मोडमध्ये’ (Danger Mode) राहू शकते. त्यामुळे चिडचिड, चिंता (Anxiety), झोपेचे प्रश्न आणि भावनिक थकवा (Emotional Exhaustion) वाढू शकतो.
2. भावनिक असुरक्षितता (Emotional Insecurity):
पालकांमधील सततच्या संघर्षामुळे मुलाच्या मनात ‘माझं घर सुरक्षित आहे का?’, ‘उद्या काय होईल?’ अशी अनिश्चितता निर्माण होते. यातून असुरक्षितता (Insecurity) आणि असहायता (Helplessness) वाढू शकते.
3. स्वतःला दोष देणे आणि अपराधीपणा (Self-blame आणि Guilt):
विशेषतः लहान किंवा संवेदनशील मुले पालकांच्या संघर्षाचे कारण स्वतःला मानतात. ‘माझ्यामुळे आई-बाबा भांडतात’ या विचारातून त्यांच्यात अपराधीपणा (Guilt) आणि कमी आत्मसन्मान (Low Self-Worth) वाढू लागतो.
4. आत्मसात केलेली असहायता (Learned Helplessness):
वारंवार प्रयत्न करूनही घरातील परिस्थिती बदलत नाही असे वाटल्यास, ‘मी काहीच बदलू शकत नाही’ अशी हतबलता निर्माण होते. दीर्घकाळ नैराश्य (Depression) किंवा निराशा (Hopelessness) असलेल्या व्यक्तीत ही अवस्था आत्महत्येच्या विचारांच्या (Suicidal Thinking) जोखमीशी संबंधित असू शकते.
5. भावनिक अनियंत्रण (Emotional Dysregulation):
घरात भावना निरोगी पद्धतीने व्यक्त करण्याचे आदर्श उदाहरण (Modelling) नसेल, तर मुलाला राग, भीती, निराशा यांचे नियमन करणे अवघड जाते. परिणामी, आवेगपूर्ण प्रतिक्रिया (Impulsive Reactions) वाढतात.
6. पलायनवादी विचार (Escape Thinking):
सततच्या संघर्षातून काही मुलांच्या मनात ‘इथून दूर जायचं आहे’ अशी पलायनवादी विचारसरणी (Escape-Oriented Thinking) निर्माण होते. अत्यंत ताण आणि इतर धोके (Risk Factors) असल्यास ही विचारसरणी आत्महत्येच्या विचारांपर्यंत (Suicidal Ideation) घेऊन जाऊ शकते.
7. भावनिक जोडणी आणि विश्वासावर परिणाम (Attachment आणि Trust वर परिणाम):
घर हे सुरक्षित आधारस्थान असण्याऐवजी संघर्षाचे ठिकाण झाले, तर पालकांशी असलेले भावनिक संबंध (Emotional Connection) कमी होतात. मुलाला ‘माझं ऐकून घेणारं कोणी नाही’ असे वाटणे विशेषतः धोकादायक ठरू शकते.
8. सामाजिक अलिप्तता (Social Withdrawal):
घरातील तणावामुळे मुले मित्रांपासून दूर जातात, संवाद कमी करतात आणि स्वतःच्या भावनांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे त्यांना मिळणारा संरक्षणात्मक आधार (Protective Support) कमी होतो.
9. झोप, एकाग्रता आणि शैक्षणिक समस्या (Sleep, Concentration आणि Academic Problems):
दीर्घकालीन कौटुंबिक ताणामुळे (Chronic Family Stress) झोप, एकाग्रता (Concentration), मेमरी (Memory), शैक्षणिक कामगिरी (Academic Performance) आणि दैनंदिन कामकाजावर (Daily Functioning) परिणाम होतो, ज्यामुळे नैराश्य (Frustration) आणखी वाढते.
आत्महत्येचे विचार, भावना आणि कृती यामागील मानसशास्त्रीय कारणे (Psychological Reasons Behind Suicidal Thoughts)
- तात्कालिक समाधान आणि निराशा सहन करण्याची क्षमता (Instant Gratification आणि Frustration Tolerance): आजच्या डिजिटल संस्कृतीमुळे मुलांना त्वरित प्रतिसाद आणि समाधानाची सवय लागली आहे. त्यामुळे ‘मला हवे आहे’ आणि ‘मला आत्ताच मिळाले पाहिजे’ यातील अंतर संपले आहे. अपेक्षा पूर्ण न झाल्यास, साधी निराशादेखील असह्य वाटते.
- वस्तूचे महत्त्व आणि आत्मसन्मान (Self-worth): काही कुमारवयीन मुलांसाठी महागडा फोन हे केवळ साधन नसून ते प्रतिष्ठा (Status), ओळख (Identity) आणि मित्रांमधील स्वीकृती (Peer Approval) बनले आहे. फोन न मिळणे म्हणजे ‘मी इतरांपेक्षा कमी आहे’ असा गैरसमज ते करून घेतात.
- भावनिक नियमनाचा अभाव (Emotional Regulation चा अभाव): कुमारवयात भावनिक मेंदूची प्रतिक्रिया तीव्र असते, तर निर्णयक्षमता आणि आवेग नियंत्रण (Impulse Control) विकसित होण्याच्या प्रक्रियेत असतात. त्यामुळे तीव्र राग किंवा निराशेच्या क्षणी ‘या क्षणापलीकडेही आयुष्य आहे’ हा विचार त्यांना सुचत नाही.
- विचारांचे संकुचित होणे (Cognitive Narrowing): तीव्र भावनिक अवस्थेत विचारांची व्याप्ती संकुचित होते. ‘मला हे मिळाले नाही म्हणजे सगलंच संपलं’ अशी ‘आरपारची विचारसरणी’ (All-or-Nothing Thinking / Cognitive Distortion) निर्माण होते. समस्या तात्पुरती असते, पण ती कायमस्वरूपी वाटते.
- ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग (Black and White Thinking): आई-वडिलांना भीती दाखवण्यामागे ‘तुम्ही माझं ऐकत नाही, पण मी गेल्यावर माझी किंमत कळेल’ हा विचार असतो. इथे परिणामांपेक्षा भावना वरचढ ठरते.
- मानसिक लवचिकता जन्मजात नसते (Resilience ही जन्मजात नसते): मानसिक लवचिकता म्हणजे संकटच येऊ न देणे नव्हे, तर संकट आले असताना त्यातून सावरण्याची क्षमता होय. मुलांना नकार, अपयश, प्रतीक्षा, कष्ट आणि अपूर्ण इच्छा यांचा आरोग्यदायी अनुभव मिळणे आवश्यक आहे.
- पालकत्वातील दोन टोके (Two Extremes of Parenting): एकीकडे अतिलाड आणि प्रत्येक मागणी पूर्ण करणे, तर दुसरीकडे सतत तुलना, कठोर टीका आणि संवादाचा अभाव—ही दोन्ही टोके मुलांसाठी घातक ठरतात.
उपाय आणि मार्ग (Solution)
- ‘नाही’ ला कौशल्य बनवा: “हे तुला मिळणार नाही” एवढ्यावर न थांबता, “आत्ता शक्य नाही; आपण यासाठी बचत करू किंवा योग्य वेळ पाहू” असा संवाद साधा.
- विलंबित समाधान (Delayed Gratification) शिकवा: हवे ते लगेच देण्याऐवजी काही गोष्टींसाठी प्रतीक्षा, नियोजन आणि प्रयत्न करायला शिकवा.
- प्रयत्नांवर आधारित कौतुक (Effort-based Reward) वाढवा: फक्त परिणामासाठी नाही, तर प्रयत्नांसाठी कौतुक करा— “तू हार न मानता पुन्हा प्रयत्न केलास, हे मला आवडलं।”
- आरोग्यदायी असमाधान (Healthy Discomfort) असू द्या: खेळ, व्यायाम, घरातील कामे, जबाबदाऱ्या, अपयश आणि प्रतीक्षा—हे मुलांचे मानसिक स्नायू मजबूत करतात.
- भावनिक शब्दसंग्रह (Emotional Vocabulary) विकसित करा: मुलाला चुकीचे म्हणण्याऐवजी “तुला आत्ता खूप राग आला आहे का?”, “निराश वाटतंय का?” असे प्रश्न विचारून त्यांच्या भावनेला नाव (मान्यता) द्या.
- समस्या (Problem) आणि आयुष्य (Life) वेगळे करायला शिकवा: “ही समस्या मोठी आहे, पण ही समस्या म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य नाही” हा दृष्टिकोन मुलांमध्ये विकसित करा.
- पालकांनी आदर्श (Role Model) व्हावे: मुले पालकांचे भाषण कमी आणि वर्तन अधिक शिकतात. पालक स्वतः रागात कसे वागतात, नकार कसा स्वीकारतात, यातूनच मुलांचे भावनिक नियमन घडते.
- आत्महत्येचे चेतावणी संकेत (Suicide Warning Signs) गांभीर्याने घ्या: “मला जगायचं नाही”, अचानक अलिप्त होणे, वस्तू वाटून देणे, मृत्यूविषयी वारंवार बोलणे ही लक्षणे दिसल्यास त्याकडे ‘लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न’ (Attention-Seeking) म्हणून दुर्लक्ष करू नका. तातडीने मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.
- ‘स्टॉप’ कौशल्य (STOP Skill) शिकवा:
- S (Stop) – थांब, लगेच कृती करू नको.
- T (Take a breath) – काही खोल श्वास घे.
- O (Observe) – माझ्या मनात आणि शरीरात काय चाललं आहे ते पाहा.
- P (Proceed) – शांत झाल्यावर पुढचा निर्णय घे.
- (ही कौशल्ये मुले शांत असताना सरावाने शिकवली पाहिजेत).
सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष (Conclusion)
मुलांना केवळ सुखी ठेवण्यापेक्षा त्यांना सुख आणि दुःख दोन्ही पेलण्यास सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. पालकत्वाचा उद्देश “माझ्या मुलाला कधीच दुःख होऊ नये” हा नसून— “दुःख आले तरी माझं मूल स्वतःला सावरू शकेल” हा असायला हवा. मानसिकदृष्ट्या सुदृढ समाज घडवणे ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे.
(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.)
संबंधित वृत्त
