Headlines

Samruddhi Mahamarg Robbery: ही कसली ‘समृद्धी’? – samruddhi mahamarg robbery series of armed robberies and attacks occured in late aug 2026


Samruddhi Mahamarg Robbery: गुन्हे कुठे घडतात, कुठल्या वेळी, कुठल्या पद्धतीने घडतात याचे मॅपिंग व्हावे. रात्रीची गस्त प्रत्यक्षात दिसावी. सीसीटीव्हीचे जाळे संवेदनशील पट्ट्यापर्यंत पोहोचावे.

Samruddhi Expressway_2
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महामार्ग जोडणारे असावेत; तोडणारे नसावेत. लुटणारे तर नसावेच नसावे. ज्या समृद्धी महामार्गाचे स्वप्न महाराष्ट्राने मोठ्या अपेक्षेने बघितले त्याच्या पूर्तीने मुंबई-नागपूर प्रवासाचे तास घटविले. वेगाला नवे परिमाण दिले. त्या रस्त्यावर छोट्यामोठ्या गाड्या सुसाट वेगाने धावतात. त्याचे कौतुक आहेच; पण आजकाल त्यावर त्यापेक्षाही अधिक वेगाने दरोडेखोरांच्या गाड्या धावत आहेत. सामान्य जनतेला लुटत आहेत. त्यांच्या मनात दहशत निर्माण करीत आहेत आणि आपली सुरक्षा यंत्रणा मात्र तोकडी ठरत आहे, याची घोर चिंता आहे.

मध्यरात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात समृद्धीवर पडत असलेले दरोडे विकसित महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला शोभणारे निश्चितच नव्हेत. हा महामार्ग साधा मार्ग नव्हे. त्या मार्गाहून विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील शेतकरी आपल्या विकासाची गाडी वेगाने मुंबईच्या दिशेने घेऊन जातील आणि उन्नत्तीचा मार्ग गाठतील ही त्यामागील मूळ भावना. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देणे हाच त्याचा खरा उद्देश. मात्र प्रारंभीच्या काळात घडलेल्या अपघातांच्या भयंकर मालिकांनी या महामार्गाला कुप्रसिद्धीच्या वाटेवर नेले. अपघात रोखण्यासाठी प्रयत्नही झाले. त्याचवेळी आणखी एक काळी सावली तिथे पडू लागली. ती म्हणजे दहशतीची, दरोड्यांची.

गुरुवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लोखंडी धारदार वस्तू फेकत दीड तास हैदोस घातला. छत्रपती संभाजीनगरच्या एका वकिलाची गाडी पंक्चर करीत, त्यांना मारहाण करीत लाखोंचा ऐवज लुटला. आणखी दोन गाड्यांना असेच लक्ष्य केले. ही झाली रात्रीची घटना. गुरुवारीच उत्तराखंडहून दर्शन घेऊन परतणाऱ्या राहुरीच्या व्यापाऱ्याला तर त्यांनी भरदिवसा सिनेस्टाइल लुटले. त्याच्या फॉर्च्युनर गाडीचा तीन गाड्यांतून पाठलाग केला. त्याला घेरले. उतरायला भाग पाडले. शिवीगाळ केली. गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची साखळी लुटली.

आपण गाडीच्या डॅश कॅमेऱ्यात चित्रित होत आहोत हे लक्षात येताच ते दहा-बारा जण पळून गेले. नांदेडच्या व्यापाऱ्यालाही काही दरोडेखोरांनी अडविले होते. त्याने बंदुकीचा बार काढताच हे पळून गेले. या सगळ्या घटना काही तासांत पाठोपाठ घडल्या म्हणून चर्चेत आल्या. यापूर्वी याच महामार्गावर कोट्यवधीच्या लुटी झाल्या आहेत. खामगावहून सोने घेऊन निघालेल्या मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याचे साडेचार किलो सोने मेहकर टोलनाक्याच्या रस्त्याहून पळविले. दुसरबीडच्या टोलनाक्यावरून बारा लाखांसह स्कॉर्पिओ गाडी पळविली होती. गाडी बंद पडली म्हणून कोपरगावजवळ थांबलेला परिवार असाच लुटला गेला.

घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन उल्हासनगरकडे जाणाऱ्या भाविकांना सिन्नर येथे मारहाण केली. लुटले. करमाडचे डॉक्टर दाम्पत्यही त्याच धक्कादायक अनुभवातून गेले. अशा किती घटना सांगाव्यात! केवळ पैसे किंवा दागिने हेच यांचे लक्ष्य नाही. ते इतके सराईत आहेत की, जे हाती लागेल ते लुटतात. भिवंडीहून कोलकात्याकडे जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून त्यांनी अडीच कोटी रुपये किमतीच्या लशी पळविल्या. डिझेल घेऊन येणारे दोन ट्रक इंजिन थंड व्हावे म्हणून रस्त्याच्या कडेला थांबले होते. चालकांचा डोळा लागला. बघता बघता त्यांच्या ट्रकमधून पाचशे लिटर डिझेल पळविले. जालन्यात तर टाकी फोडून डिझेल पळविले.

खरे तर ‘समृद्धी’ हा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग. टोलनाके, सीसीटीव्ही, महामार्ग पोलिसांचे जाळे; तरी दरोडेखोर महामार्गावर येतात कुठून? लूट करून त्यांची वाहने कोणत्या मार्गाने पसार होतात? महामार्गालगत चोरवाटा किंवा अनधिकृत प्रवेशमार्ग आहेत का? स्थानिक गुन्हेगारांना महामार्गावरील प्रवाशांची आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते कशी? या प्रश्नांचा छडा लावणे महत्त्वाचे आहे. आता दरोड्यांचे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधण्याची वेळ आली आहे.

आपत्कालीन यंत्रणा सक्षम व्हावी. संशयास्पद वाहनांवर तातडीने लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी राहावी. दरोडेखोरांचे आंतरजिल्हा व आंतरराज्यीय नेटवर्क उखडून काढले जावे. अन्यथा आधी ज्या मार्गावर अपघाताने माणसे मरत होती, आता त्या मार्गावर प्रवाशांच्या मनातील निर्भयता मरेल. महाराष्ट्र म्हणजे सुखरूप प्रवास ही ओळख संपेल. विकासाचा मार्ग, दरोडेखोरांच्या दहशतीचा मार्ग बनणे, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी शोभेचे नाही. ‘समृद्धी’साठी तर नाहीच नाही!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा