Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठाद्वेष्टे:प्रत्येकवेळी शासन निर्णय काढून पुन्हा विश्वासघात केला जातो, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप




मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, त्यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस हे मराठाद्वेष्टे असून, प्रत्येकवेळी नवीन शासन निर्णय (GR) काढून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवले जाते आणि त्यानंतर त्यांचा विश्वासघात केला जातो, असा आरोप जाधव यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची इच्छा नाही, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला. सरकारमधील कोणत्याही नेत्यावर आता मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जरांगे यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली असून, त्यांच्या आंदोलनासाठी महायुती सरकारच जबाबदार असल्याचे जाधव म्हणाले. ‘जरांगे आता उद्विग्न झाले आहेत’ भास्कर जाधव म्हणाले की, प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना पुढे करून जरांगे पाटील यांना शब्द दिला जातो. त्यानंतर तो शब्द पूर्ण केला जात नाही. या प्रकारामुळे जरांगे पाटील आता उद्विग्न झाले आहेत. यावेळी आपण स्वतः जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जाधव यांनी राज्यात ‘हम करे सो कायदा’ अशा पद्धतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. मराठी सक्तीच्या निर्णयावरही निशाणा मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरूनही भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला. मराठी भाषेबाबत भाजपची भूमिका काय आहे, हे या निर्णयातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली. तसेच भाजपला आता मित्रपक्ष ओझे वाटू लागले असून, त्यांना केवळ सत्ता हवी आहे, असा आरोपही जाधव यांनी केला. जरांगेंचा मुंबईकडे जाण्याचा इशारा दरम्यान, अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाकडून चर्चेसाठी अद्याप ठोस हालचाल झालेली नसल्याने जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळातच मुंबईकडे जाण्याचे आवाहन करण्यात आल्याने आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भास्कर जाधव जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याने या भेटीत काय चर्चा होते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत