सभापती राम शिंदे यांनी ही निवडणूक जाहीर केल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव सादर करणाऱ्या अंबादास दानवे यांच्याशी माझे बोलणे झाले असून, निवडणूक बिनविरोध होण्यास त्यांनी संमती दर्शविल्याचे सभागृहात सांगत, अनिल परब यांना हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. परब यांनी ती मान्य करत परिषदेच्या परंपरेला साजेशी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी इच्छा व्यक्त करत प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यास अभिजीत वंजारी यांनी अनुमोदन दिल्याचे जाहीर केल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अहिर यांच्या नावाचे तिन्ही प्रस्ताव मांडण्यात आले. प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.
सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट; उपसभापती पदाबाबत नीलम गोऱ्हे थेट बोलल्या
सभापती राम शिंदे यांनी अहिर यांची उपसभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर केल्यावर सर्व आमदारांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. ‘अहिर या नावाचा अर्थ गोपालक तसेच निर्भीड असा होतो, सचिन अहिर हेसुद्धा राजकारणातील निर्भीड कार्यकर्ते आहेत’, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिर यांचे अभिनंदन करताना काढले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी मोठे मन दाखविल्याने त्यांनी विरोधकांचेही आभार मानले. तसेच, अहिर हे कायदेशीर पद्धतीने उपसभापती झाले असून, आता इतर सर्व प्रश्न गौण आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारकीच्या वैधतेविषयी विरोधकांना उत्तर दिले.
लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणे, त्यांच्या व्यथा-वेदना समजून घेणे आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षांपेक्षा समाजाला प्राधान्य देणे यामुळेच लोक त्यांना नेता म्हणून स्वीकारतात’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत ‘आपल्या माणसाचा सन्मान झाला’ अशी मुंबईकरांची भावना असल्याचे नमूद केले. ‘आमच्या संघात आता आणखी एक ‘ऑलराऊंडर’ आला आहे. गोलंदाज कोणताही असो, चेंडू कितीही वेगवान असो, सचिन अहिर हे षटकार मारल्याशिवाय थांबत नाहीत. जसे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर दिग्गज आहेत, तसेच राजकारण आणि समाजकारणात सचिन अहिर हेही आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. एक सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला, तर दुसऱ्या सचिनने जबाबदारीचे पॅड बांधून नव्या डावाला सुरुवात केली आहे’ अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
Sachin Ahir : उपसभापती करा किंवा मंत्रिपद द्या, अहिरांनी दिलेले दोन पर्याय; ठाकरेंच्या तीन शिलेदारांची शिंदेंशी गुप्त चर्चा
‘अहिर यांचे अजित पवार आणि पवार कुटुंबाशी गेले तीन दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध असून, अहिर यांच्यातील गुण हेरून तरुण वयात त्यांना अजितदादांनी नवनव्या जबाबदाऱ्या राष्ट्रवादीत दिल्या होत्या. त्याचे त्यांनी राजकीय जीवनात सार्थक केले’, असे कौतुकोद्गार उपमुख्यंमत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राम शिंदे यांनी अहिर यांना आता फलंदाजी करण्याची बॅट खाली ठेवून पंचाची हॅट डोक्यावर चढविण्याचा सल्ला दिला. तसेच, परिषदेच्या उज्ज्वल परंपरेचा अहिर एक भाग झाल्याचे नमूद केले.
अभिनंदनाच्या प्रस्तावावर उत्तर देताना अहिर यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचा पट मांडला. राजकीय समीकरणे बदलली तरी कष्टकरी, कामगार, वंचितांशी असलेली बांधिलकी ही कायमच राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोळशातून हिरा शोधावा त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शोधून काढले, असे ते म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्याला भरभरून दिले. त्यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असेही ते म्हणाले.
Vihan Shrivastav : घरच्या ओढीने निघालेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला, स्कूलबसवर झाड कोसळून करुण अंत, ऑफिसमध्येच आईवर दुःखाचा डोंगर
… तर रामायण झाले नसते !
विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवे, अशी भूमिका अहिर यांनी मांडली. ‘विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर इतके रामायण घडले नसते. तो लोकशाहीचा कणा आहे’, असे अहिर हे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाले. ‘तुम्ही एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून त्यावर निर्णय घ्या, मीदेखील शब्द टाकतो आणि हा विषय तडीस लावा’, असे ते पाटील यांना म्हणाले.

