Rohit Sharma Parents reach London : रोहित शर्माने आपल्या पालकांची लंडनला येण्याची वैयक्तिकरीत्या व्यवस्था केली, जेणेकरुन ते ‘लॉर्ड्स’वर उपस्थित राहून मुलाचा अखेरचा सामना याचि देहि याचि डोळा पाहू शकतील

रोहितने स्वतः फ्लाईट बुक केल्या
‘क्रेक्स’ने दिलेल्या खळबळजनक वृत्तानुसार रोहित शर्माने आपल्या पालकांची लंडनला येण्याची वैयक्तिकरीत्या व्यवस्था केली. जेणेकरुन ते ‘लॉर्ड्स’वर उपस्थित राहून लेकाचा अखेरचा सामना याचि देहि याचि डोळा पाहू शकतील. एकदिवसीय संघाच्या स्वरुपाबाबत राष्ट्रीय निवड समितीच्या भविष्यातील नियोजनासंदर्भात अलिकडेच झालेल्या चर्चेनंतर या हालचाली पाहायला मिळाल्या.
युवा खेळाडूंचा मार्ग प्रशस्त
निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गेल्या आठवड्यात रोहितशी चर्चा करुन आपल्या दीर्घकालीन रणनीतींची माहिती दिली. सध्या संघ व्यवस्थापन फलंदाजीच्या वरच्या फळीसाठी युवा खेळाडूंच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. यशस्वी जैस्वालसारखे उदयोन्मुख खेळाडू भविष्यात ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापुढे रोहितची निवड संघात होणार नाही
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर रोहित शर्मा या निर्णयावर नाराज असल्याचे समजते. मात्र एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्तावर शिक्कामोर्तब केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. “सिलेक्टर्सनी असा निर्णय घेतला आहे की, यापुढे ते रोहित शर्माची एकदिवसीय सामन्यांसाठी निवड करणार नाहीत. त्याला सन्मानपूर्वक निवृत्त व्हायचे असेल किंवा लगेच निवृत्तीचा निर्णय घ्यायचा नसेल, तर ती पूर्णपणे त्याची वैयक्तिक बाब असेल. मात्र मेसेज स्पष्ट आहे: रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यानंतर सिलेक्टर त्याला वनडे सामन्यांसाठी संघात घेणार नाहीत.”
Rohit Sharma : नम्रता संभेराव म्हणाली, तुमच्याशी मराठीत बोलते; रोहित शर्माचं उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल
सुरुवातीला अफगाणिस्तान विरुद्धची मायदेशातील मालिका ही रोहितची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ठरेल, असे संकेत मिळत होते. मात्र त्या कालावधीत रोहितने केलेल्या अर्धशतकामुळे सिलेक्टर्सनी हा निर्णय पुढे ढकलला.
इंग्लंड दौऱ्यात रोहितचा सूर हरवला
इंग्लंड दौऱ्यात रोहितची फलंदाजीतील कामगिरी अत्यंत ढिसाळ राहिली आहे. एजबॅस्टन येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ ११ धावा करता आल्या, तर कार्डिफमधील दुसऱ्या सामन्यातही यजमान संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर लय हरवलेल्या रोहितने ४७ चेंडूंत केवळ २६ धावांची संथ खेळी केली.
२०२७ च्या उत्तरार्धात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहितचे वय चाळीशी ओलांडलेले असेल, हे लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने युवा फळीच्या जडणघडणीला प्राधान्य दिले आहे.
याआधी कसोटी आणि टी२० तून निवृत्ती
‘क्रिकेटचे माहेरघर’ मानले जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर रविवारी होणारा अंतिम सामना एका युगाचा पूर्णपणे अस्त होत असल्याचे दर्शवतो. याआधी, २९ जून २०२४ रोजी केंसिंग्टन ओव्हल येथे भारताला टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर लगेचच रोहित शर्माने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये त्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकण्याची घोषणा केली होती.
Sunetra Pawar यांच्याकडून वारकऱ्यांसाठी खास स्नेहभोजन पण लाडका वारकरीच नाही पंगतीला
वनडे क्रिकेटमध्ये हिटमॅनची भन्नाट कामगिरी
इंग्लंडविरुद्धचा आगामी तिसरा वनडे सामना जर खरोखरच रोहितचा अखेरचा सामना ठरला, तर क्रिकेटच्या इतिहासातील एका अत्यंत यशस्वी कारकिर्दीची सांगता होईल. २८६ वनडे सामन्यांमध्ये त्याने ४८.६७ च्या प्रभावी सरासरीने ११ हजार ७३१ धावा केल्या आहेत. यामध्ये ३२ शतके आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे.
कॅप्टन म्हणूनही रोहित अव्वल
तसेच, वनडे क्रिकेटच्या इतिहासात एका डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा (२६४ धावा) विक्रमही त्याच्याच नावावर आहे. रोहितची कर्णधारपदाची कारकीर्दही तितकीच ऐतिहासिक राहिली आहे. संघाला २०२३ च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेणे आणि टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणे यांसारख्या कामगिरींचा समावेश आहे.
IND vs ENG 2nd ODI : इंग्लंडचा भारतावर 4 विकेटने विजय! ‘मला त्यांच्याकडून आशा होती’; कॅप्टन गिलने सांगितलं मॅच नेमकी कुठे गमावली?
रोहितचे आई-वडील सध्या लंडनमध्ये असल्याने रोहितची निवृत्ती निश्चित मानली जात असून टीम इंडियाच्या जर्सीमध्ये शेवटचे मैदानावर उतरताना पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत.

