मला नेहमीच बाप-मुलाच्या नात्याच्या कथा खूप जवळच्या वाटतात. बाप आणि मुलगा हे दोघंही अनेकदा स्वतःला कुटुंबप्रमुख मानत असल्यानं त्यांच्यात एक वेगळा संघर्ष सुरू असतो. संवादाचा अभावही दिसतो. खऱ्या आयुष्यातही माझं माझ्या वडिलांशी असलेलं नातं हळूहळू विकसित झालं.
‘समर्थ‘ मध्ये मात्र फक्त बाप-मुलाचं नातं नाही, तर विश्वंभर या पात्राचा स्वतःशी सुरू असलेला संघर्षही आहे. शहरातील कोलाहलात राहून शांतता कशी शोधायची, प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल कसा साधायचा, हा त्याच्या प्रवासाचा गाभा आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली.
Sunny Deol : ‘पैशांसाठी मी माझी तत्त्व विकणार नाही’, सनी देओलनं सांगितलं ‘पान मसाला’ची जाहिरात न करण्याचं कारण
विश्वंभरची भूमिका साकारण्यासाठी तुझी पूर्वतयारी कशी होती ?
सुरुवातीला मला माझ्या नेहमीच्या प्रतिमेशी जुळणारी दुसरी भूमिका देण्यात आली होती. पण मी वडिलांची भूमिका स्वतःहून मागून घेतली. मधल्या काळात मला स्वतःलाच वाटत होतं, की मी ज्या प्रकारच्या भूमिका करत आलो, त्यांच्याशी आता मी रिलेट करू शकत नाही. अभिनय सोडून द्यावंसही वाटत होतं. त्यामुळे मी दिग्दर्शक योगेश यांच्याकडे आग्रह धरला आणि या भूमिकेसाठी ऑडिशन देण्याची संधी मागितली. मला विश्वंभरच्या मनःस्थितीशी नातं जोडता येत होतं. त्यासाठी मी वजन कमी केलं, मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम यांसारख्या ग्रंथांचं वाचन केलं. आमचे निर्माते आणि अनेक प्रवचनकार यांच्याशी संवाद साधला. त्या प्रक्रियेत समर्थांच्या विचारांची खरी व्याप्ती समजली. कोणत्याही धर्मानं द्वेष शिकवलेला नाही, तर प्रेम आणि समतेची शिकवण दिली आहे, हा माझा विश्वास आणखी दृढ झाला.
सगळं सोडून द्यावंसं वाटत असल्याचं तू म्हणालासः नेमकं काय घडत होतं ?
मनोरंजन क्षेत्रात ‘सिस्टिम’ ज्या पद्धतीनं काम करते, त्यात मला अनेक गोष्टी खटकत होत्या. कलाकार आणि स्पॉटबॉयला वेगवेगळी वागणूक मिळते, हे पटत नव्हतं. सोशल मीडियावर वाढत जाणारा कलाकारांविषयीचा द्वेषही अस्वस्थ करणारा होता. त्यामुळे मी सोशल मीडिया वापरणं जवळपास बंद केलं. दुसरं म्हणजे, मला सतत ‘पुष्कराज चांगला अभिनेता आहे, पण त्याचा योग्य वापर होत नाही’ हे ऐकावं लागत होतं. एका टप्प्यावर या वाक्याचाही कंटाळा आला. मला वाटलं, आता जे करायचं त्याची जबाबदारी स्वतः घ्यायची. मला मुळात दिग्दर्शक व्हायचं होतं, पण अभिनयाच्या सुखसोयींमध्ये मी अडकलो होतो. त्यातून निर्माण झालेला गोंधळ, अपेक्षा, निराशा आणि स्वतःबद्दलचे प्रश्न यामुळे सगळं सोडून द्यावंसं वाटत होतं.
तू मालिकेत काम करणं कमी का केलंस?
मी कदाचित मालिकेत काम करणार नाही, असं लोकांनीच गृहीत धरलं आहे. मात्र, मला चित्रपट अधिक जवळचे वाटतात, हे खरं आहे. नाटकात प्रेक्षकांची प्रतिक्रिया लगेच मिळते, मालिकेत काही काळानंतर पात्र सापडतं आणि ते विकसित करता येतं; पण सिनेमात ती संधी नसते. एकदा कॅमेरा बंद झाला आणि चित्रपट प्रदर्शित झाला, की ते कायमचं तसंच राहतं. त्यामुळे प्रत्येक प्रसंग अचूक साधावाच लागतो. मला हे आव्हान आवडतं.
Ashwin Mushran : ‘मुन्नाभाई’ फेम अभिनेत्याची बाईकला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचे वडील गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
अभिनयासोबत आता दिग्दर्शन आणि लेखनाचं काम सुरू ठेवणार का ?
मी काही लघुपट दिग्दर्शित केले आहेत. आता मी यूट्युबसाठी वेगळ्या प्रकारच्या मालिकांवर काम करतोय. आज गावोगावी मोबाइल आणि यूट्यूब पोहोचलंय. त्यामुळे शहराकडे बघण्याच्या नजरेतून ग्रामीण भागातील कथा सांगण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय. पुढचं वर्षभर अभिनयाची चांगली कामं करतानाच हा प्रकल्प राबवण्याचा माझा विचार आहे. डिसेंबर-जानेवारीपासून त्याचं स्वरूप लोकांसमोर येईल. चित्रपट दिग्दर्शनही करायचं आहे. काही कथा लिहून झाल्या आहेत. पण घाई न करता योग्य वेळ घेऊन ते करायचं आहे.
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
गावागावांत फिरून तू नेमकं काय शोधत आहेस ?
मी तिथे कथा शोधतोय. माझ्या काही कल्पना घेऊन जातो आणि तिथल्या लेखक, कलाकारांबरोबर संवाद साधतो. खेड्यांमधील लेखक, संगीतकार आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून द्यायचंय. त्यांच्यासोबत काम करायचंय. गावांमध्ये फिरताना मला वास्तववादी, जमिनीशी जोडलेली माणसं भेटतात. आपण शहरात राहून जे अनुभवत नाही, ते ते अनुभवत असतात. भाषा, लहेजा, संस्कृती या गोष्टी बदलतात; पण भावना आणि नातेसंबंध सारखेच राहतात. एखादी गोष्ट जितकी वैयक्तिक आणि स्थानिक असते तितकीच ती सार्वत्रिक बनते. आज माझा प्रयत्न हाच आहे, की अशा कथा शोधाव्यात, त्या कथांमधील कलाकारांना पुढे आणावं आणि त्यांच्या अनुभवांना व्यापक रूप मिळवून द्यावं.
‘समर्थ’नं मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे शांतता शोधण्यासाठी जग सोडण्याची गरज नसते. आपण कोलाहलात राहूनही शांत राहू शकतो. विश्वंभरच्या प्रवासातून मला हे जाणवलं, की आयुष्यातील त्रास, संघर्ष आणि प्रश्न कायम राहणार आहेत; पण त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलू शकते
