Headlines

Pune budhwar peth boyfriend kills young woman over love dispute sentenced to life imprisonment; बुधवार पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच क्रूरपणे संपवलं; तरुणाला आता कोर्टाचा दणका, आयुष्यभराचा धडा


Pune News: बुधवार पेठेतील तरुणीवर तिच्या प्रियकराने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात आता कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

pune budhwar peth (5)
बुधवार पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच क्रूरपणे संपवलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या करणाऱ्या प्रियकराला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तरुणीला वाचविण्यासाठी आरोपीकडून चाकू हिसकावून घेताना जखमी झालेल्या पोलिस अंमलदारांसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी नोंदविलेली साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.

सुखदेव रामदास मडावी (वय ३४, रा. वडरवाडी, मूळ रा. यवतमाळ) याला न्यायालयाने दोषी ठरविले. संबंध तोडल्याच्या वादातून त्याने २२ वर्षीय तरुणीचा खून केला होता. ही घटना २३ मे २०१७ रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास बुधवार पेठेतील जनता बिल्डिंग आणि फूड प्लाझा हॉटेल परिसरात घडली. संबंधित तरुणी बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करायची. आरोपीचे तिच्याशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी आरोपी सुखदेवचा तिच्याशी वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने तरुणीच्या छातीवर आणि पोटात वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारांपूर्वी मृत्यू झाला.

ही घटना पाहून गस्तीवर असलेले फरासखाना ठाण्याचे तत्कालीन अंमलदार सुहास साळुंखे यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चाकू हिसकावताना झालेल्या झटापटीत साळुंखे यांच्या बोटांना दुखापत झाली. पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी पायऱ्यांवरून घसरून पडला. साळुंखे यांनी दुसऱ्या पोलिस अंमलदाराच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी आणि अमित देवतरसे यांनी चौदा साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपीला पकडणारे पोलिस अंमलदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेप ठोठावली.