कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रमेश सुकऱ्या म्हात्रेविरोधातील तपासाला वेग आला आहे. तपासाचा भाग म्हणून सोमवारी तपास यंत्रणांनी आधारवाडी कारागृहात जाऊन म्हात्रेच्या आवाजाचे नमुने घेतले. सीसीटीव्ही
.
या प्रकरणाचा तपास कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवले असल्याने तपास यंत्रणा कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व पुरावे आणि साक्षी बारकाईने गोळा करत आहे. सरकारी पक्षाने उच्च न्यायालयात येत्या 20 दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
सीसीटीव्ही फुटेजचे आठ तास विश्लेषण
तपासादरम्यान गेल्या आठवड्यात मुंबईहून आलेल्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने शास्त्रीनगर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचे सलग आठ तास विश्लेषण केले. या प्रकरणाशी संबंधित यंत्रणेतील कर्मचारी, ठेकेदार आणि नियंत्रण कक्षातील संबंधित व्यक्तींचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. तपासात संकलित करण्यात आलेले सर्व पुरावे सीलबंद करून न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत.
न्यायालयीन कोठडीत आणखी 15 दिवसांची वाढ
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वी रमेश म्हात्रेला 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत ही कोठडी आणखी 15 दिवसांनी वाढविण्यात आली. त्यामुळे सध्या त्याचा मुक्काम आधारवाडी कारागृहातच राहणार आहे. दरम्यान, म्हात्रेच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
नगरसेवकांच्या भूमिकेतही बदल
या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक नगरसेवकांच्या कामकाजाच्या पद्धतीतही बदल झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी नगरसेवक थेट डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत असत. मात्र डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर अनेक नगरसेवक नागरिकांना थेट रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देत असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा…
साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही:गरज असल्यास महाराष्ट्राबाहेर जातो, नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून कोर्टाला विनवणी

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी विनंती केली. ‘आपण सध्या तुरुंगात असल्याने पीडित आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच पोलिसांचा तपासही बहुतांश पूर्ण झाला आहे. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास चार-सहा आठवडे राज्याबाहेर राहण्याची अट घालून जामीन मंजूर करावा,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
कल्याण रुग्णालय प्रकरण:रमेश म्हात्रे म्हणाले, ‘महिला डॉक्टरला मारहाण नाही’, रुग्णाची आई म्हणाली, ‘बाहेर पूर आणि डॉक्टर म्हणाले सायनला न्या!’

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्या महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे. केवळ सीसीटीव्हीच्या कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत आहे,” असा दावा करत म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर वाचा…
