शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन करावी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं, असा प्रस्ताव २०१४ मध्येच माझ्याकडे आला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: शिवसेनेसोबत जाऊन सत्ता करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे २०१४ मध्येच आला होता, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस चे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शिवसेना , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवू, असा प्रस्ताव मित्रपक्षानं २०१४ मध्येच दिला होता. पण तो प्रस्ताव मी उभ्या उभ्या फेटाळला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मित्रपक्षाकडून डिसेंबर २०१४ मध्ये माझ्याकडे आला होता. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला आणि भाजपचं सरकार आलं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवू, आपण एकत्र येऊ, अशा स्वरुपाचा प्रस्ताव होता. मी तो प्रस्ताव उभ्या उभ्या फेटाळला. त्यावेळी मूळ कल्पना एकत्र यायचं का, ही होती. मग नंतर पुढच्या गोष्टी झाल्या असत्या. पण मी तिथल्या तिथे प्रस्ताव फेटाळला. कारण आमच्या पक्षाला सेनेसोबत जाणं मान्यच होणार नव्हतं. मी प्रस्ताव घेऊन गेलो तर आमचे पक्षश्रेष्ठी ओरडतील, असं मला वाटलं होतं,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.
२०१४ मध्ये फेटाळलेला प्रस्ताव २०१९ मध्ये मीच पुढे केला. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ५ वर्षे ज्याप्रकारे राज्य केलं. त्यांनी ज्या प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे १७५ नेते फोडले. त्या नेत्यांची यादी माझ्याकडे आताही आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाची भीती दाखवून आमचे नेते फोडले गेले. कारखान्यांचं कर्ज बंद करतो, कारखाना लिलावात काढतो, अशी भीती दाखवून १७५ नेते फोडण्यात आले. ही फोडाफोड थांबली नाही तर मग आपलं काही खरं नाही, असा विचार आम्ही केला. कारण पैशांपुढे काही चालत नाही. म्हणून २०१९ ला शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्लीला नेला, असं चव्हाण यांनी सांगितलं.
शिवसेनेसोबत जाऊन २०१४ मध्येच सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मित्रपक्षानं दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. त्यावर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. तशा कोणत्याही प्रस्तावाची कल्पना नसल्याचं शिंदे म्हणाले.’२०१४ मध्येही आमचं सरकार कायम राहिलं असतं. पण आता हे सांगून फायदा नाही. त्यावर आता बोलून काय उपयोग होणार?,’ असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
‘आम्ही मित्रपक्ष त्यावेळी एकोप्यानं राहिलो असतो तर भाजप सत्तेत आली नसती. पण आम्ही चुका केल्या. पण त्या चुकांची उजळणी करत बसणं आता गरजेचं नाही. झालं ते झालं. आम्ही सगळे मित्रपक्षांसोबत एकत्र राहिलो असतो तर आजही राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार असतं,’ असं शशिकांत शिंदे म्हणाले.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा