What is PM Modi’s ‘Saptadhara’ Plan: 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी7 प्रमुख स्तंभांची ओळख पटवली, जे भारताच्या भविष्यातील विकासाला चालना देतील आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला गती देतील.

पंतप्रधान मोदींची ‘सप्तधारा’
विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2047 पर्यंत ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यात 7 स्तंभ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. पंतप्रधानांनी उत्पादन क्षेत्र, कृषी, तंत्रज्ञान, ‘गती शक्ती’, संरक्षण, हरित ऊर्जा आणि ‘सॉफ्ट पॉवर’ या 7 क्षेत्रांची भारताचे भविष्य घडवणारे घटक म्हणून उध्दरूत केले.
पहिले सामर्थ्य – उत्पादन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाने उत्पादन क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. केवळ मोठ्या प्रमाणावरील उत्पादनावरच नव्हे, तर देशात लहान आणि सुटे भाग तयार करण्यावरही भर दिला पाहिजे. सुटे भागांपासून संपूर्ण यंत्रे आणि उत्पादनांपर्यंत विस्तार करण्याचे त्यांचे उद्देश असून त्यांनी पुढे म्हटले की, भारतीय कंपन्यांनी गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या जोरावर जागतिक बाजारात आपली ओळख निर्माण केली पाहिजे. त्यामुळे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होता कामा नये.
दुसरी शक्ती: शेतकरी अन् अन्न प्रक्रिया
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि अन्न उत्पादन व प्रक्रियेला ‘सप्तधारा’ची दुसरी शक्ती म्हटले. पंतप्रधान म्हणाले की भारताचे मसाले, फळे, फुले आणि इतर खाद्य उत्पादने जागतिक बाजारात उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच केवळ कृषी उत्पादने विकण्याऐवजी भारताने उच्च-मूल्याच्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.
तिसरी शक्ती: तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन
पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच तिसरी ताकद म्हणून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज डेटा सेंटर्स, एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाचे युग आहे आणि नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान भारतासाठी आव्हाने आणि संधी दोन्ही घेऊन येत आहेत. त्यांनी पुढे म्हटले की, भारताने इनोव्हेशनचे जागतिक केंद्र बनले पाहिजे आणि देशातील डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगभरातील इतर देशांमध्ये प्रसारित करण्याच्या दिशेने काम करण्याच्या गरजेवरही भर देण्याचे आवाहन केले.
चौथी शक्ती – वेग आणि कनेक्टिव्हिटी
देशभरात अधिक जलद आणि उत्तम कनेक्टिव्हिटीवर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, शहरांना मेट्रोशी जोडणे, बंदरे आणि जमिनीवरील कनेक्टिव्हिटी सुधारणे, तसेच देशभरात वस्तू आणि लोकांच्या वाहतुकीला सुलभ करणे गरजेचे आहे.
पाचवी शक्ती – संरक्षण आणि सायबर सुरक्षा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील भारताचे आत्मनिर्भरत्व देशाने आणि जगानेही पाहिले आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी सायबर सुरक्षा आव्हान बनत असून अशा स्थितीत, पंतप्रधानांनी सायबर सुरक्षेला संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचेही सांगितले आणि या क्षेत्रात तरुणांच्या क्षमतेचा उपयोग करून घेता येईल.
सहावी शक्ती: ग्रीन आणि ब्लू अर्थव्यवस्था
पंतप्रधान मोदींनी ग्रीन हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा साठवण, हरित गतिशीलता आणि हरित उत्पादन यांच्या मोठ्या विस्ताराचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, भारतामध्ये पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्याची क्षमता असून भारताचा लांब किनारा देखील ब्लू इकॉनॉमीसाठी मोठी ताकद असून मत्स्यव्यवसाय, किनारी पर्यटन आणि सागरी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे.
सातवी शक्ती – भारताची सॉफ्ट पॉवर
पंतप्रधान मोदी म्हणाले की, योगने जगभरातील लाखो लोकांना भारताशी जोडले. याव्यतिरिक्त आयुर्वेद, समग्र आरोग्यसेवा, आध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटन, हस्तकला, भारतीय संस्कृती, चित्रपट, गेमिंग, व्हीएफएक्स, ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंट या क्षेत्रांमध्ये भारताकडे प्रचंड क्षमता आहे.

