Third Mumbai in Pen: पेण तालुक्यातील हजारो प्रवासी दररोज व्यावसाय आणि शिक्षणासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांना अनियमित एक्सप्रेस, मेमू गाड्या आणि एसटी वसवर अवलंबून रहावं लागतं.
वैभव भोळे, अलिबाग: आकर्षक गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या, रायगड जिल्ह्यातील पेण परिसराचे रुपांतर आता ‘ तिसरी मुंबई ‘ मध्ये करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वेगवान विकासाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पेण-पनवेल लोकल सेवा पुन्हा चर्चेत आली आहे. प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या लोकलची प्रतीक्षा आजही कायम आहे.
पेणपर्यंत लोकलची मागणी
पेण ग्रोथ सेंटर’ प्रकल्पामुळे पेण, रसायनी, नागोठणे परिसरात औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे चित्र आहे. पेण आणि आसपासचा परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरण, औद्योगिक वाढ, जेएनपीटीचा विस्तार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रभाव, तसेच अलिबाग-रायगड पर्यटनामुळे पेणचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पेणपर्यंत लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
सध्या पेण, अलिबाग, नागोठणे, रोहा या भागातील हजारो नागरिक रोज नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेलच्या दिशेने प्रवास करतात. बहुतांश प्रवास एसटी, खासगी वाहने किंवा महामार्गावर अवलंबून असल्याने वाहतूककोंडी, अपघात आणि प्रवासाचा वाढता खर्च या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. हजारो प्रवासी असल्याने नियमित लोकल सेवा हा प्रवाशांना मोठा दिलासा ठरू शकतो.
मर्यादित एक्सप्रेस आणि मेमू गाड्या
मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार रायगडकडे झपाट्याने होत असताना, भविष्यात लाखो प्रवाशांची रेल्वेवर अवलंबित्व वाढणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या पेण ते पनवेल दरम्यान एक्सप्रेस आणि मेमू गाड्या धावत असल्या, तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. नियमित लोकल सेवा नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून अभियंता जीवन पाटील यांनी ३ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवत पेण-पनवेल लोकल तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप रेल्वे प्रशासनाकडून त्यावर कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केंद्राकडे याकरिता पाठवपुरवा करावा अशी मागणी होत आहे.
‘तिसरी मुंबई उभी करायची असेल तर आधी रेल्वे सुविधा सक्षम करा’ अशी भूमिका आता नागरिकांकडून घेतली जात आहे. रायगडच्या विकासाला ‘मुंबईची नवी दिशा’ म्हणून पाहिले जात असताना, आता पेण-पनवेल लोकलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“पेण परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणारे तसेच शिक्षण व्यवसाय व नोकरीनिमित्त पनवेल व मुंबईत दररोज ये-जा करणारे हजारो लोक आहेत. ही संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. पेण-पनवेल दरम्यान एसटी बस फारच कमी आहेत. सायंकाळी पनवेलहून पेणकडे येणे कठीण होऊन बसते. दिव्यांग व महिलांची सर्वाधिक अडचण होते. दोन्ही बाजूने सकाळी व संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत प्रवाशांची तुफान गर्दी असल्याने पेण-पनवेल मार्गावर लोकल सेवा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे,” जीवन पाटील, निवृत्त अभियंता, मुंबई महानगरपालिका
लोकल ट्रेनमुळे रोजच्या प्रवाशांचा वेळ आणि खर्च कमी होईल
महामार्गावरील वाहतूक ताण कमी होईल
औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मदत होईल
पर्यटनाला चालना मिळेल
विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना सुरक्षित व स्वस्त प्रवास पर्याय मिळेल
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा