कोस्ट्युक, गॉफ यांचे आव्हान समाप्त, ओस्टापेंको-अरेव्हालो मिश्र दुहेरीत विजेते
वृत्तसंस्था, लंडन
2026 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत यावेळी झेकच्या लिंडा नोस्कोव्हा आणि कॅरोलिना मुचोव्हा यांच्यात जेतेपदासाठी शनिवारी लढत होत आहे. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नोस्कोव्हाने युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युकचा तर मुचोव्हाने अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत लॅटव्हीयाची जेलेना ओस्टापेंको आणि अल साल्वादोरचा मार्सेलो अरेव्हालो यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकाविले.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लिंडा नोस्कोव्हाने युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युकचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता 21 वर्षीय नोस्कोव्हाला जेतेपदासाठी आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोव्हाशी लढत द्यावी लागेल.
महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाने अमेरिकेच्या सातव्या मानांकीत कोको गॉफचा संघर्षपूर्ण लढतीत 6-2, 1-6, 7-6, (12-10) अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 2 तास 35 मिनिटे चालला होता. 2017 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या जेतेपदासाठी अमेरिकेच्या स्लोअन स्टिफेन्स आणि मॅडिसन किज यांच्यात लढत झाली होती आणि स्टिफेन्सने विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर प्रथमच एकाच देशाच्या दोन महिला खेळाडूंत जेतेपदाची लढत होत आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत झेकच्या खेळाडूंकडून तिसऱ्यांदा जेतेपद मिळविले जाणार आहे.
ओस्टापेन्को-अरेव्हालो मिश्र दुहेरीत विजेते
लॅटव्हियाची एलेना ओस्टापेंको आणि अल साल्वादोरचा अरेव्हालो या जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात ओस्टापेंको आणि अरेव्हालो या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर आणि मार्क पोलमन्स यांचा 4-6, 7-5, 10-2 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. अल साल्वादोरच्या अरेव्हालोने यापूर्वी दोनवेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीचे जेतेपद मिळविले असून विम्बल्डन स्पर्धेत जेतेपद मिळविणारा तो अल साल्वादोरचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. ओस्टापेंकोने यापूर्वी 2017 साली फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीचे जेतेपद तर 2024 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.
