फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : मोरोक्कोवर 2-0 ने मात, एमबाप्पे व डेम्बेलेने नोंदविले गोल
फॉक्सबरो, मॅसॅच्युसेट्स : पहिल्या सत्रामध्ये पेनल्टी किक चुकवल्यानंतर एम्बाप्पेने एक गोल केला आणि एका गोलसाठी साहाय्य केले. उस्मान डेम्बेलेनेही गोल केला आणि दोन वेळच्या विजेत्या फ्रान्सने गुऊवारी उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोला 2-0 ने हरवले. मंगळवारी डॅलस येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना स्पेन किंवा बेल्जियमशी होईल. या वर्षीच्या विश्वचषकातील आपला आठवा गोल केल्यानंतर किलियन एम्बाप्पेने आपले हात पसरवले. नंतर दुखापतीच्या शक्यतेमुळे खेळातून बाहेर पडताना त्याने स्टेडियममध्ये विखुरलेल्या उत्साही फ्रान्सच्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. उजव्या घोट्याला दुखापत असूनही आपण ठीक असल्याचे सांगणाऱ्या आपल्या या स्टार स्ट्रायकरसह फ्रान्स संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
मोरक्कन बचावपटूने जोरदार धडक दिल्यानंतर 76 व्या मिनिटाला एम्बाप्पे जमिनीवर कोसळला आणि एका मिनिटानंतर त्याच्या जागी बदली खेळाडू आणण्यात आला. त्यानंतर तो त्याच्या उजव्या घोट्यावर बर्फाची पिशवी घेऊन बाकावर बसलेला दिसला. सामन्यानंतर दोन्ही बूट घातलेल्या अवस्थेत एमबाप्पेने आपल्या सहकाऱ्यांसोबत धावत आणि उड्या मारत आनंद साजरा केला. ‘माझ्या घोट्याला थोडी दुखापत झाली, पण मी ठीक आहे’, असे एमबाप्पेने सांगितले.
मोरोक्कोला चेंडू सुरक्षितपणे दूर करता न आल्याने एमबाप्पेने गोलपोस्टच्या दूरच्या खांबाच्या अगदी जवळ अचूक फटका मारून गोल केला. त्याला ‘पेनल्टी एरिया’च्या अगदी बाहेर चेंडू मिळाला. त्याने काही पावले पुढे टाकली आणि मग चेंडू जाळीत सारला. फ्रान्सचा दुसरा गोल तेव्हा झाला जेव्हा एमबाप्पेने पास स्वीकारला आणि तो डेम्बेलेच्या दिशेने परत केला. एमबाप्पे पुढे धावत राहिला आणि त्याने प्रतिस्पर्धी बचावपटूंना स्वत:कडे आकर्षित केले, ज्यामुळे डेम्बेलेला फटका मारण्यासाठी मोकळी जागा मिळाली.
पहिल्या सत्रामध्ये पेनल्टी हुकल्यानंतरही एमबाप्पेने ज्या प्रकारे स्वत:ला सावरले आणि चांगली कामगिरी केली, त्याबद्दल आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही, असे डेम्बेलेने सांगितले. तो आमचा कर्णधार आहे आणि त्याची मानसिकता अविश्वसनीय आहे. आम्हाला त्याच्याकडून आणखी गोलांची अपेक्षा आहे, असे डेम्बेले म्हणाला.
या सामन्यात गोलवरील फटक्यांच्या बाबतीत फ्रान्सकडे 21-4 अशी आघाडी राहिली. सामन्यातील गोलवरील पहिला फटका देखील एमबाप्पेनेच मारला होता, परंतु चौथ्या मिनिटाला मारलेला तो फटका उजव्या बाजूने थोडासा बाहेर गेला. त्यानंतर 25 व्या मिनिटाला डाव्या बाजूने धावत असताना मोरोक्कोचा बचावपटू नुसेर मझाउई याने ‘बॉक्स’मध्ये त्याला पाडले. पंचांनी त्वरित पेनल्टी स्पॉटकडे बोट दाखवून पेनल्टी दिली.
एमबाप्पे पेनल्टी मारण्यासाठी सज्ज झाला होता, परंतु ‘व्हिडिओ रिह्यू’च्या प्रदीर्घ प्रक्रियेमुळे त्याला थांबावे लागले. अखेरीस 28 व्या मिनिटाला त्याला फटका मारण्याची परवानगी मिळाली, मात्र उजव्या कोपऱ्याच्या दिशेने मारलेला त्याचा फटका गोलरक्षक यासिन बोनू याने अडवला, कारण त्याने चेंडूच्या दिशेचा अचूक अंदाज घेतला होता.
यावर्षीच्या विश्वचषकात एमबाप्पेने याआधी केवळ एकदाच पेनल्टी घेतली होती. ती 16 संघांच्या फेरीमध्ये पॅराग्वेविऊद्ध फ्रान्सने मिळवलेल्या 1-0 अशा विजयाच्या सामन्यात होती. तरीही पहिल्या सत्रात फ्रान्सचा संघ आक्रमकतेच्या बाबतीत अधिक सरस ठरला. मोरोक्कोला त्यांची सर्वोत्तम संधी मध्यांतरापूर्वी मिळाली. त्यावेळी अश्रफ हकिमीने ‘बॉक्स’च्या अगदी बाहेरून घेतलेली ‘फ्री-किक’ उजव्या खांबाच्या बाजूने बाहेर गेली.
20 व्या विश्वचषक सामन्यात 20 वा गोल
60 व्या मिनिटाला एम्बाप्पेने केलेला गोल हा त्याच्या विश्वचषक कारकिर्दीतील 20 वा गोल होता आणि स्पर्धेतील त्याच्या 20 व्या सामन्यात त्याने हा गोल केला. तो अर्जेंटिनाचा कर्णधार लायोनेल मेस्सीपेक्षा एका गोलने मागे राहिला आहे. डेम्बेलेने 66 व्या मिनिटाला स्पर्धेतील आपला पाचवा गोल केला.
कतारमध्येही तितक्याच फरकाने मोरोक्को पराभूत
कतारमधील 2022 च्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही फ्रान्सने मोरोक्कोचा याच फरकाने पराभव केला होता. त्यावेळी मोरोक्को उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला होता. सलग तीन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत खेळणारा तिसरा देश बनण्याच्या दिशेने फ्रान्सची वाटचाल सुरू आहे.
आराम करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जिंकणे. जोपर्यंत आम्ही ते करत नाही, तोपर्यंत आम्ही ढिलाई दाखवणार नाही.
– किलियन एमबाप्पे, फ्रान्सचा आघाडीपटू
उपांत्यपूर्ण सामने
1) इंग्लंड वि. नॉर्वे
वेळ : मध्यरात्री 2.30 वा.
स्थळ : मियामी
2) अर्जेन्टिना वि. स्वित्झर्लंड
वेळ : रविवारी सकाळी 6.30 वा.
स्थळ : कन्सास सिटी.
