Headlines

Nitin gadkari announcement of 60000 crore projects to reduce traffic congestion in pune; पुण्याच्या वाढीचा अंदाज चुकला, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६० हजार कोटींची कामे करणार; गडकरींची घोषणा



म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यातील आजची वाहतूक कोंडी पाहता, मुंबई-पुणे महामार्ग बांधताना भविष्यातील वाहतुकीचा विचार करून तो बांधायला हवा होता, असे आता वाटते. पुणे इतक्या वेगाने वाढेल, याचा अंदाजच नव्हता, त्यामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नियोजन चुकले अशी कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली.

हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी असतानाही पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसगणिक वाढत असल्याने पुणे आता हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे आता आजच्या अडचणींवर तात्पुरते उपाय करण्याऐवजी भविष्याचा विचार करून रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. सिम्बायोसिसच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर, कुलसचिव डॉ. एम. एस. शेजूळ उपस्थित होते.

राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे महामार्गाचे नियोजन करताना चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव होता. भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन सहापदरी रस्त्याचा आग्रह धरला. मात्र, आता हा मार्गही अपुरा पडत आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची क्षमता ठरवली पाहिजे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधा विकसित करताना आजच्या गरजांबरोबरच पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगार वाढतो. वाहतूक खर्च कमी झाल्यास भारतीय उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे होणार आहे, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात ६० हजार कोटींची कामे

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि खेड-नाशिक फाटा या मार्गांवर कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय पुणे-संभाजीनगर मार्ग सहापदरी करण्याचे कामही सुरू आहे. या विविध रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांची कामे पुढील काळात करण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत