पश्चिम बंगाल, ईशान्य भारताच्या राजकारणात कालपर्यंत किरकोळीच्याही भावात गेला नसता व ज्याच्या खात्यात जेमतेम ७५ रुपये आहेत अशा ‘नॅशनालिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाचं निशाण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून उड्या मारलेल्या २० लोकसभा सदस्यांनी हाती धरलं. त्रिपुरातल्या या पक्षाचा या अशा कारणासाठी शोध लावण्याचं खरं श्रेय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू सरकार यांना. आता हा पक्ष एनडीएच्या पारड्यातला चांगलाच वजनदार पक्ष ठरला आहे. मूळ तृणमूल काँग्रेसचं काय होणार, हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या कृपेनं अपेक्षेनुसार सुटेपर्यंत तरी या नव्या पक्षाची चलती राहणार. या निमित्ताने जरा वेगळ्या मुद्द्याचा हा ऊहापोह. हा मुद्दा म्हणजे ममता यांचा हात सोडून भाजपकडे धाव घेतलेल्यांमधील तारेतारकांची प्रभावी उपस्थिती.
राजकारणात क्रिकेट-चित्रपट-दूरचित्रवाणी मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यांचा प्रवेश हा प्रकार आपल्याकडेच नव्हे, तर जगभरात नवीन नाही. तारांकित, लोकप्रिय चेहरे म्हणजे प्रभावी लोकप्रतिनिधी हा समज किती योग्यायोग्य हे राजकीय नेत्यांना चांगलंच माहिती असतं. दिवंगत अरुण जेटली संसदेतील अशा तारेतारकांना विनोदानं ‘गेस्ट आर्टिस्ट’ (पाहुणे कलाकार) म्हणत. ‘यांचं ‘पॅराशूट लँडिंग’ आम्ही पक्ष करतो; पण या बहुतेकांना राजकारणात रस नसतो. संसद, पक्षसंघटना किंवा सरकारमध्येही त्यातले बहुतेकजण काही बरं काम करतात असं नव्हे; पण त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जे काम केलंय त्याचा लाभ आम्हाला (राजकारणी) घ्यायचा असतो’ असं जेटली अनेकदा हसतहसत सांगत.
ममता यांनी तर सिने तारेतारकांना संसदेत आणण्याचा सपाटाच लावला. मुनमुन सेन, देव (दीपक अधिकारी), नुसरत जहां, मिमी चक्रवर्ती, शताब्दी रॉय, रचना बॅनर्जी, जून मालिया, अशा अनेकांना ममतांनी थेट दिल्ली दाखवली. यातल्याच काहींनी त्यांची साथ अलीकडं सोडली. शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, बाबुल सुप्रियो हे भाजपच्या ताकानं तोंड पोळल्यावर ममतांच्या तंबूत गेले. लॉकेट चॅटर्जींना भाजपनं संसदेवर आणलं. अलीकडं भर लोकसभेत ई सिगारेटचा आनंद घेणारे कीर्ती आझाद यांनी क्रिकेटच्या वादात जेटली यांच्याशी वाजल्यावर भाजप सोडून ‘तृणमूल’चा मार्ग धरला. दत्त, पठाण, सायोनी, शताब्दी, देव अधिकारी यांसारख्या अनेकांची ओळख मतदारांना आधीपासून होती. ममता यांनी त्याचं रूपांतर मतांमध्ये केलं. पण या वर्गाची संसदीय उपयुक्तता नेमकी किती होती आहे व असेल?
भारतीय लोकशाहीच्या इतिहासाला चित्रपटसृष्टी, क्रीडा, कला आणि मनोरंजन क्षेत्रातील ताऱ्यांचे आकर्षण नवे नाही. स्वातंत्र्योत्तर काळातच पृथ्वीराज कपूर यांना राज्यसभा सदस्यत्व मिळाले, तेव्हा याची सुरुवात झाली होती; पण नंतर हा विचार हळूहळू निवडणूक व्यवस्थापनाच्या शॉर्टकटमध्ये बदलला.
एक कार्यकर्ता तयार करणं हे किती महाकठीण काम असतं, या एका विषयावर गृहमंत्री अमित शहा यांची विस्तृत मुलाखत आहे. त्याउलट एखाद्या सुपरस्टारला पक्षात आणणं खूपच सोपं. पत्रकार परिषद घ्या, पक्षाचा झेंडा हातात द्या, गळ्यात पक्षाचं उपरणं टाका आणि त्या दिवसापासून तो/ती लोकप्रतिनिधी बनण्याच्या शर्यतीत उतरतात. अमिताभ बच्चन, सुनील दत्त, शबाना आझमी, जावेद अख्तर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, जयाप्रदा, रेखा, जया बच्चन आदी अनेक कलाकार संसदेची पायरी चढले. रवि किशन, कंगना रणौत, निरहुआ, सुरेश गोपी, मनोज तिवारी आदी सध्या आहेतच. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू, कीर्ती आझाद, चेतन चौहान यांसारखे खेळाडूही संसदेची पायरी चढले व परत गेले. विनोद खन्ना, हेमा मालिनींसारखे अपवाद सोडता लोकप्रतिनिधी म्हणून या साऱ्यांची कामगिरी काय हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच. भारतरत्न लता मंगेशकर, चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी तर राज्यसभेत नियमितपणे जाण्याचीही तसदी घेतली नाही. यात नेमका दोष कोणाचा?
१९८० आणि १९९०च्या दशकात दूरदर्शनवरील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांनी भारतीय समाजावर अक्षरशः जादू केली होती. सीता झालेल्या दीपिका चिखलिया, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आदी लोकसभेवर आले; तर हनुमानाची भूमिका करणारे दारा सिंह राज्यसभेत पोहोचले. त्यामानानं गोविल यांना लोकसभेवर आणण्यास भाजपने अंमळ उशीरच केला! स्मृती इराणी यांचा स्वभाव सोडा; पण त्यांनी ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ मुंबईतच ठेवून दिल्लीत पाऊल ठेवल्यानं त्यांची भाजप नेत्या ते मंत्री, खासदार म्हणून कामगिरी झाली.
दक्षिण भारतात कवी-लेखक करुणानिधींपासून रूपेरी पडदा गाजवणारे एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, जयललिता, चिरंजीवी, कमला हासन, विजयकांत, पवन कल्याण, उदयनिधी स्टॅलीन आदींपासून टीव्हीके प्रमुख व सध्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांसारख्या अनेकांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यातल्या ज्यांना ते जमलं त्यांनी राजकारण ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ असा व्यवसाय असतो हे नीट समजून घेण्याचा सतत प्रयत्न केला. अनेकांनी तर स्वतंत्र राजकीय प्रवाह निर्माण केले. बाकी भागांतून आलेल्या अनेक सेलिब्रिटींचं संसदीय रेकॉर्ड पाहिलं की दोन्हीतला फरक स्पष्ट दिसतो.
एखाद्याची लोकप्रियता मतं मिळवू शकते, पण ती राजकीय स्थैर्य देईलच असं नाही. ती संघटना बांधू शकत नाही. ती गर्दी जमवू शकते पण पक्षनिष्ठा नाही निर्माण करू शकत. शेवटी लोकशाही चालवायला ‘स्टार’ नव्हे, लोकांचेच प्रतिनिधी लागतात. अण्णा हजारे पोस्टरवर शोभतात; पण दिल्ली चालवायला केजरीवाल-सिसोदिया लागतात. लोकशाहीत चमकते चेहरे झटक्यात मंचावर आणणं खूप सोपं आणि भारतीय राजकारणाला शॉर्टकटचं आकर्षण सुटलेलं नाही… आजही.
mangesh.w@timesofindia.com

