Headlines

Nasrapur Toddler Case फाशी द्या… फाशी द्या’ नसरापूरच्या नराधमाला फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे सोलापुरात स्वागत


प्रतिनिधी : सोलापूर
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी (दि. २९) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापुरात नागरिकांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. शहरातील चौपाड परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी त्यांनी “फाशी द्या… फाशी द्या… नसरापूरच्या नराधमाला फाशी द्या”, “झाली पाहिजे… झाली पाहिजे… फाशीची शिक्षा झाली पाहिजे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. संतप्त नागरिकांनी आरोपीला कोणतीही दया न दाखवता तातडीने फाशीची शिक्षा अंमलात आणावी, अशी जोरदार मागणी केली.

दरम्यान, वटपौर्णिमेनिमित्त पूजेसाठी आलेल्या महिला भगिनींनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. महिलांवरील व चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी न्यायव्यवस्थेवरील विश्वास व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, सात्विक बडवे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान आरोपीचा निषेध करण्यात आला. भविष्यात अशा अमानुष घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी महिलांवरील व बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून अल्पावधीत निकाल द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

उपस्थितांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करत हा निर्णय समाजात कायद्याची भीती निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शिक्षा सुनावण्यावरच न थांबता त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, जेणेकरून पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि भविष्यात अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर संदेश जाईल, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

नसरापूर प्रकरणानंतर राज्यभरातून झालेल्या जनआंदोलनांमुळे आणि नागरिकांच्या एकजुटीमुळे या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत