मुंबई :
मुंबई पोलिसांनी शहरातील विविध भागांमधील 11 ऑर्केस्ट्रा बारवर बंदीची कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल मुंबईतील 11 प्रमुख ऑर्केस्ट्रा बारचे परवाने 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.
या बारमध्ये नियम आणि परवान्याच्या अटींचे उल्लंघन होत असल्याच्या पोलिसांना वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केलेल्या बारमध्ये डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेनोरिटा, सफायर, सनशाईन पंजाब, राज पॅलेस आणि ब्लू डायमंड यांचा समावेश आहे.
अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारवर कारवाई
अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमांडो, उर्वशी आणि साईप्रसाद बार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विलास लंच होम, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरंजीवी आणि मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वागतम बार यांचे परवानेही एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
अनेक प्रकरणं आली समोर
तपासादरम्यान, या सर्व 11 ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नृत्य आणि ग्राहकांसोबत अयोग्य जवळीक साधल्याची प्रकरणे आढळून आली. पोलिसांच्या मते, हे परवान्याच्या अटी व शर्तींचे उघड उल्लंघन होते. पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, समाजात अशा अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिले जाणार नाही. तसेच, परवान्याच्या नियमांचे आणि अटींचे यापुढेही उल्लंघन झाल्यास, अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
…
