Headlines

Mumbai mla report card congress mlas top the list eknath shinde mlas perform the worst; मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब


Mumbai News: प्रजा फाउंडेशनने मुंबई शहरातील आमदारांचे प्रगतीपुस्तक जारी केले असून विविध निकषांचे आधारे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

eknath shinde aditya thackeray
मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: स्वयंसेवी संस्था प्रजा फाउंडेशनच्या ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’मधून काँग्रेसच्या आमदारांनी हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ चमकदार कामगिरी केल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे.

मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. या काळात १५व्या विधानसभेत एकूण २,२१३ प्रश्न विचारण्यात आले. १२व्या विधानसभेतील याच कालावधीतील ७,९५५ प्रश्नांच्या तुलनेत ही संख्या ७२ टक्क्यांनी कमी आहे.

विधानसभेचे कामकाज पहिल्या वर्षात केवळ ४० दिवस झाले. ३३ आमदारांपैकी केवळ तीन आमदारांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. आमदारांचे सरासरी गुणही १२व्या विधानसभेतील ६१ वरून १५व्या विधानसभेत ५५ वर आले आहेत. प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरीही ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर घसरली आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये पहिल्या तीनही क्रमांकांवर काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारली. अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला, तर अस्लम शेख ८०.५८ गुणांसह दुसऱ्या आणि ज्योती गायकवाड ८०.३० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या यादीत चौथ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू आणि पाचव्या क्रमांकावर ठाकरेंच्या शिवसेनेचेच भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर हे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे हे या यादीत १८ व्या स्थानी आहेत.

आमदारांची सभागृहातील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, प्रश्नांचे विषय, गुन्हेगारी रेकॉर्ड अशा आधारावर ही कामगिरी ठरवण्यात आली आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये सगळ्यात खालच्या स्थानी म्हणजे ३३ व्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे असून शिवसेनेचेच आमदार अशोक पाटील हे ३२ व्या क्रमांकावर आहेत. तर घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम हे ३१ व्या क्रमांकावर आहेत.

मुंबईतल्या एकूण आमदारांचे सरासरी वय कालानुरूप वाढत असल्याचे दिसते: १२व्या विधानसभेत आमदारांचे सरासरी वय ५२ वर्षे होते, १३व्या विधानसभेत ते काहीसे कमी होऊन ५१ वर्षे झाले. १४व्या विधानसभेत ते पुन्हा वाढून ५३ वर्षे आणि आता १५व्या विधानसभेत ते ५७ वर्षे झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.