Headlines

Moshi Accident: जीव झाले कचरामोल! – pimpri chinchwad moshi garbage depot building collapse accident special explained


Moshi Accident: राज्यातील सर्वच शहरांत कचऱ्याची विल्हेवाट ही डोकेदुखी ठरली असून, त्यावर शाश्वत उपाय अद्याप तरी यंत्रणांच्या हाती लागलेला नाही.

moshi building collapse.
moshi building collapse.(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
राज्यातील अनेक शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न उग्र बनला आहेच; पण आता तो थेट प्राणघातक ठरू शकतो, याचा अनुभव पुणे जिल्ह्यातील मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेतून आला. येथे साठलेल्या कचऱ्याचा पहाड प्रकल्पाच्या आवारातील इमारतीवर कोसळला आणि त्या ओझ्याने तीन मजली इमारतही कोसळल्याची घटना थरकाप उडवणारी आहे.

इमारतीमधील ११ जण ढिगाऱ्याखाली अडकले; त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या वाढू शकते. केवळ ‘अपघात’ किंवा मुसळधार पावसामुळे ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून हा प्रकार सोडून देता येणार नाही, तर साऱ्या नागरी नियोजनातील त्रुटी व गैरव्यवस्थापन या दुर्घटनेला जबाबदार आहेत. सुमारे तीस वर्षांपूर्वी ८१ एकरांवर सुरू करण्यात आलेल्या या कचरा डेपोमध्ये शंभर-दोनशे फुटांचे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘बायो मायनिंग’ किंवा कचऱ्यापासून वीजनिर्मितीसारखे पर्याय समोर येत असले, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील रोजच्या दीड हजार टनाच्या कचऱ्याच्या तुलनेत ते अत्यल्पच आहेत.

याच वीजनिर्मिती कंत्राटदार कंपनीला कचरा डेपोच्या आवारात आणि या डोंगरांशेजारीच प्रशासकीय इमारत बांधण्यास परवानगी कशी मिळाली, कचऱ्यातील घटकांच्या रासायनिक परिणामांनी जमीन खचण्यासारख्या धोक्यांचा विचार झाला होता का, प्रकल्पस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेची साधने होती का आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित कंत्राटदारांना कोणाचे आशीर्वाद होते, अशा प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाला द्यावीच लागतील. त्यामुळेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. पूर्वी शहराबाहेर असलेल्या या कचरा डेपोच्या परिसरात आता मोठी लोकवस्ती झाली आहे. कचऱ्याचा दुर्गंध आणि त्यातून वाहणारे प्रदूषित पाणी यांमुळे परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे अनारोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. पाण्यामुळे इंद्रायणी नदीही दूषित झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आवाक्याबाहेरचा ठरू लागलेल्या या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आता राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालणे, ही काळाची गरज बनली आहे. नागरिकांनीही ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करणे आणि त्यातील अधिकाधिक कचरा जागेवरच जिरवणे, ही त्यातील महत्त्वाची पायरी असून, त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा